जनावरांच्या अवैध वाहतुकीच्या संशयावरून खेडमध्ये दोन गटांत हाणामारी
परस्परविरोधी गुन्हे दाखल
खेड: तालुक्यातील नारंगी फाटा येथे जनावरांच्या अवैध वाहतुकीच्या संशयावरून दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याची घटना १३ मे २०२६ रोजी मध्यरात्री घडली आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंच्या तक्रारीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत, फिर्यादी ऋतिक सुनील जाधव (वय २६, रा. चिंचघर-प्रभुवाडी, सध्या रा. विरार, मुंबई) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ सुरज सुनील जाधव हा गाडीमध्ये गुरे भरत असल्याच्या संशयावरून आरोपी त्रुपेश निंबाळकर, रिक्षाचालक चव्हाण आणि खेडेकर (रा. चांभारवाडी) यांनी त्याला अडवून वाद घातला.
या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, आरोपींनी सुरजच्या कपाळावर कोणत्या तरी साधनाने वार करून त्यास जखमी केले. तसेच फिर्यादी ऋतिक जाधव यांना बांबूच्या काठीने मारहाण करण्यात आली, तर त्यांचे मित्र तेजस शेलार, प्रणय शेलार, जीवन कडू आणि विकी जाधव यांनाही धक्काबुक्की व शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी खेड पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक १३९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११५(२), ११८(१), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या बाजूने, प्रसाद प्रकाश बर्गे (वय ३७, रा.
चाकाळे हनुमान नगर, खेड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. बर्गे यांच्या सांगण्यानुसार, ते त्यांच्या गोरक्षक सहकाऱ्यांसह जनावरांच्या अवैध वाहतुकीचा शोध घेत असताना त्यांना आरोपी सुरज जाधव दुचाकीवरून येताना दिसला. त्याला थांबवून जनावरांच्या वाहतुकीबाबत विचारणा केली असता, सुरजने वाद घालण्यास सुरुवात केली. त्याच वेळी मागाहून आलेल्या ऋतिक जाधव याने लोखंडी पाईपने प्रसाद बर्गे यांच्या कमरेवर वार केले, तर दोन्ही आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत पुलावरून ढकलून दिले. या घटनेत बर्गे यांच्या टाचेला गंभीर दुखापत झाली असून, त्यांचे सहकारी प्रवीण कदम यांनाही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या तक्रारीवरून सुरज आणि ऋतिक जाधव यांच्यावर गुन्हा रजिस्टर क्रमांक १४०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११५(२), ११८(१), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.