आजारपणाला कंटाळून वृद्धाची आत्महत्या
खरवते येथील घटना
चिपळूण (प्रतिनिधी):
तालुक्यातील खरवते, बौद्धवाडी येथील एका ६२ वर्षीय वृद्धाने सततच्या आजाराला कंटाळून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनिल गोविंद पवार असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल पवार हे गेल्या दोन वर्षांपासून गुडघेदुखीच्या तीव्र आजाराने त्रस्त होते. या आजारामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर शारीरिक त्रास होत होता. याच शारीरिक त्रासाला आणि वेदनांना कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
बुधवार, दिनांक १३ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास त्यांनी खरवते, बौद्धवाडी येथील आपल्या राहत्या घरातील बेडरुममध्ये गळफास लावून घेतला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. १३ मे रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास या गुन्ह्याची रीतसर नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.