मोकाट म्हशींनी आंबा-काजू बागेचे केले नुकसान
जांभवली येथील पशुपालकावर गुन्हा दाखल
राजापूर (प्रतिनिधी):
राजापूर तालुक्यातील सोल्ये गावात आंबा आणि काजूच्या बागेत मोकाट गुरे सोडून झाडांचे नुकसान केल्याप्रकरणी एका पशुपालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतीचे नुकसान झाल्यामुळे हसोळ येथील शेतकरी एकनाथ नरहरी लाड यांनी पोलिसांत धाव घेतली आहे.
फिर्यादी एकनाथ नरहरी लाड (वय ६०, रा. हसोळतळी) यांची सोल्ये गावात आंबा आणि काजूची बाग आहे. शनिवार, दिनांक ९ मे २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास लाड आपल्या बागेत गेले असता, त्यांना आंबा आणि काजूच्या कलमांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून आले. त्यांनी अधिक पाहणी केली असता, शेतघराजवळ काही म्हशी आणि वासरे बागेत चरताना आढळली.
तपासात असे समोर आले की, जांभवली येथील रहिवासी श्रीधर वामन पोटले यांनी आपल्या मालकीच्या म्हशी आणि वासरांना दावणीला न बांधता मोकाट सोडून दिले होते. ही जनावरे लाड यांच्या बागेत घुसली आणि त्यांनी झाडांचे नुकसान केले.
बागेच्या झालेल्या नुकसानीबाबत एकनाथ लाड यांनी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून आरोपी श्रीधर वामन पोटले (वय ४५, रा. जांभवली) याच्याविरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम ११८ अन्वये गुन्हा (गु.र.नं. १२५/२०२६) दाखल करण्यात आला आहे.
बागेतील झाडांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले असून, परिसरात आपल्या जनावरांना मोकाट सोडणाऱ्या पशुपालकांवर या कारवाईमुळे जरब बसण्याची शक्यता आहे.