मोटार भाड्याला घेऊन गेला तो परत आलाच नाही ; चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः भाड्यासाठी मोटार गाडी घेऊन चालक परत आलाच नाही. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तन्मय चंद्रकात पाटील उर्फ गंगावणे (रा. चाफवली, ता. संगमेश्वर, रत्नागिरी ) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना २८ एप्रिल २०२६ दुपारी दोनच्या सुमारास तालुक्यातील वळके-धनगरवाडी, रत्नागिरी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी संदिप एकनाथ चव्हाण (वय ४३, रा. प्रभानवल्ली, खैरवाडी, ता. लांजा, रत्नागिरी) यांच्याकडे संशयित तन्मय पाटील-गंगावणे हा चालक म्हणून कामाला होता. २६ एप्रिलला मोटार (क्र. एमएछ-०८ बीई ०४६६) ही गाडी भाड्याकरिता घेऊन गेला तो परत आला नाही. त्याचा शोध घेतला असता संशयित २८ एप्रिलला दुपारी दोन च्या सुमारास वळके-धनगरवाडी येथे असल्याचे समजले. तेथे जावून पाहिले असता तिथूनही तो निघून गेला होता. या प्रकरणी संदिप चव्हाण यांनी फसवणूक केल्या प्रकरणी संशयिताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी मोटारीसहीत पलायन करणाऱ्या संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.