राजापुरात मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात
तिघे जखमी, इनोव्हा चालकावर गुन्हा दाखल
राजापूर:
मुंबई-गोवा महामार्गावरील उन्हाळे गंगातीर्थ तिठा येथे १ मे रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास एका भरधाव इनोव्हा कारने दोन वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीन प्रवासी जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी जयेश बाळकृष्ण मांजलकर (३३, रा. ठाणे, मूळ रा. वैभववाडी) हे आपल्या मारुती सुझुकी फ्रॉन्क्स गाडीने (MH 03 EF 5425) ठाण्याहून वैभववाडीकडे जात होते. सकाळी ७ च्या सुमारास ते उन्हाळे गंगातीर्थ तिठा येथे पोहोचले असता, समोरून चुकीच्या बाजूने येणाऱ्या इनोव्हा क्रिस्टा कारने (MH 48 AX 2223) त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली.
एवढ्यावरच न थांबता, या इनोव्हाने फिर्यादीच्या पाठीमागून येणाऱ्या टेम्पोलाही (MH 04 FP 5532) धडक दिली. आरोपी चालक सतिश नामदेव खरात (४३, रा. नालासोपारा) याने आपली गाडी अत्यंत हयगयीने, निष्काळजीपणे आणि अतिवेगाने चालवून हा अपघात घडवून आणला.
या अपघातात दोन्ही वाहनांमधील मतिराम चौधरी, प्राची निवेकर, उज्वला निवेकर हे तीन प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
याप्रकरणी जयेश मांजलकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजापूर पोलिसांनी आरोपी चालक सतिश खरात याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटर वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.