तहानलेल्या वाड्यांची एकाच टँकरवर मदार
खेड : तालुक्यात उन्हाच्या काहिलीने ग्रामस्थ मेटाकुटीस आलेले असतानाच टंचाईग्रस्त गाव-वाड्यांच्या दिवसागणिक वाढत्या संख्येमुळे प्रशासनही आतापासूनच जेरीस आले आहेत. ७ गावातील १५ वाड्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झालेले असताना अवघ्या एकाच शासकीय टँकरवर मदार आहे. हुंबरीसह तुळशी बुद्रुक्र येथील प्रत्येकी २ वाड्यांनी टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे धाव घेतली आहे.
तालुक्यात ९ एप्रिलपासून टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीचे दहा दिवस वगळता त्यानंतर ग्रामस्थांचे एकामागोमाग एक टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल होवू लागले. सद्यस्थितीत घेरारसाळगड-भराडे धनगरवाडी, निमणी-धनगरवाडी, कशेडी-बंगला, बोरटोक, खवटी-खालची धनगरवाडी, वरची धनगरवाडी, सवेणी-धनगरवाडी, केळणे- भोसलेवाडी, मांगलेवाडी, तळे-धनगरवाडी, बौद्धवाडी, पालांडेवाडी, कासई-बोरवाडी तहानलेल्या असून ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे.
तिसंगी-खांडेकरवाडी व धनगरवाडीलाही टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाल्याने तहानलेल्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. या टंचाईग्रस्त गाव-वाड्यांमध्ये एक दिवस आड १८ टँकरच्या फेऱ्या धावत आहेत.
प्रशासनाकडे घेतली धाव
हुंबरी येथील म्हाळुंगे-धनगरवाडी, तुळशी खुर्द येथील कुबजाई धनगरवाडी येथेही उपलब्ध पाण्याचे जलस्रोत आटल्याने ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे धाव घेतली आहे. सद्यस्थितीत एकच शासकीय टँकर असल्याने टँकरने पाणीपुरवठा करताना दमछाक होत आहे. रणरणत्या उन्हामुळे टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या हळूहळू वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.