जीवन प्राधिकरणच्या तेरा हजारनिवृत्त कर्मचाऱ्यांची उपासमार
सहा महिन्यांपासून पेन्शन अनियमित
रत्नागिरी :- महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील (मजीप्रा) सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून निवृत्तिवेतन वाटपात मोठी अनियमितता सुरू असून, एप्रिल महिना संपत आला तरी मार्च महिन्याचे पेन्शन अद्याप मिळालेले नाही. यामुळे राज्यभरातील सुमारे १३ हजार पेन्शनधारक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यात रत्नागिरी जिल्ह्यातील १८५ निवृत्तांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांची दैनंदिन खर्चाची समस्या गंभीर झाली असून, अनेक व्याधीग्रस्तांचे उपचार रखडले आहेत.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यांची जबाबदारी २३ मार्च २०१७च्या शासन निर्णयानुसार शासनाने स्वीकारली आहे. मात्र, प्रत्यक्षात गेल्या सहा महिन्यांपासून पेन्शन वेळेवर मिळत नसल्याने ‘शासकीय आश्वासने केवळ कागदावरच’ असल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे, याच विभागातील कार्यरत कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत असताना केवळ निवृत्तांनाच वंचित ठेवले जात असल्याने ‘हा दुजाभाव का’, असा संतप्त सवाल सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस राजाराम विठाळकर यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पाणीपुरवठा विभाग आणि वित्त विभाग यांच्यात योग्य समन्वय नसल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप होत आहे. निवृत्तिवेतन लेखाशीर्षाला मुदतवाढ न मिळाल्याने ही तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे समजते.
यासंदर्भात रत्नागिरी जिल्हा शाखेचे अध्यक्ष सतीश सोहोनी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना निवेदन सादर करून त्यात ही व्यथा मांडली आहे. जोपर्यंत शासनाचा निधी प्राप्त होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या राखीव निधीतून पेन्शन अदा करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे .