धम्मध्वज फडकवत रत्नागिरीत भव्य बाईक रॅली; आंबेडकरी एकतेचे दमदार दर्शन
रत्नागिरी /प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त सोमवारी 13 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेली भव्य मोटार-बाईक रॅली उत्साह, शिस्त आणि सामाजिक भान यांचा सुंदर संगम ठरली. जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अनंत सावंत आणि एल. वी. पवार यांच्या हस्ते धम्मध्वज फडकवून रॅलीला हिरवा कंदील देण्यात आला. शांततेत, मात्र तितक्याच दणदणीत वातावरणात ही रॅली पार पडली.
शेकडो दुचाकीस्वारांनी पंचशील ध्वजांनी सजवलेल्या वाहनांसह रॅलीत सहभाग नोंदवला. नियोजित मार्गावरून शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करत आंबेडकरी बांधवांनी संघटित शक्तीचे प्रभावी दर्शन घडवले. प्रत्येक टप्प्यावर अनुशासन, संयम आणि उत्साह यांचा समतोल राखत रॅली पुढे सरकत राहिली. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो… तथागत गौतम बुद्धांचा विजय असो…” अशा घोषणांनी परिसर अक्षरशः दणाणून गेला. या घोषणांमधून सामाजिक समता, बंधुता आणि न्यायाच्या मूल्यांचा जागर घडत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

नाचणे आठवडा बाजार येथून प्रारंभ झालेली भव्य बाईक रॅली थिबा बुद्ध विहार येथे पोहोचताच वातावरण अधिकच पावन आणि आध्यात्मिक झाले. येथे उपस्थित आंबेडकरी बांधवांनी एकत्रितपणे त्रिशरण व पंचशील ग्रहण करून तथागत गौतम बुद्धांच्या विचारांना व मूल्यांना उजाळा दिला. शिस्तबद्ध व एकात्मतेच्या भावनेत पार पडलेला हा धार्मिक आणि वैचारिक क्षण रॅलीचा विशेष आकर्षण ठरला. यानंतर रॅलीची सांगता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. कृतज्ञता, आदर आणि विचारांप्रती निष्ठा व्यक्त करत उपस्थितांनी “जय भीम”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला.
रॅलीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून चोख आणि तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतूक नियंत्रणासह सुरक्षा व्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आल्याने संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पडला.एकूणच, भव्य सहभाग, अनुशासित आयोजन आणि विचारप्रबोधनाचा प्रभावी संदेश देत ही बाईक रॅली जयंती महोत्सवातील एक संस्मरणीय ठरली आहे.
