पावसाळ्यापूर्वी यंत्रणा सतर्क करा आमदार किरण सामंत यांचे प्रशासनाला निर्देश
राजापूर तालुक्याची मान्सून पूर्व आढावा बैठक आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न
राजापूर : तालुक्यातील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेली महत्त्वपूर्ण बैठक आमदार किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या बैठकीत विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणींचा विचार करून त्यावर योग्य वेळी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार किरण सामंत यांनी सर्व संबंधित विभागांना सतर्क राहण्याचे तसेच नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना तत्काळ राबविण्याचे निर्देश दिले.
बैठकीत विशेषतः पावसाळ्यातील रस्त्यांची दुरुस्ती, नालेसफाई, पूरप्रवण भागातील उपाययोजना, वीज पुरवठा सुरळीत ठेवणे, आरोग्य विभागाची तयारी, आपत्कालीन सेवा तत्पर ठेवणे यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच ज्या ठिकाणी दरवर्षी पाणी साचते किंवा नुकसान होते, त्या भागांवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
आमदार सामंत यांनी सांगितले की, “मान्सून काळात नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारीत राहणे आवश्यक आहे. प्रत्येक विभागाने समन्वय साधून काम केल्यास आपत्ती टाळता येऊ शकते.”
यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या तयारीचा आढावा सादर केला. काही ठिकाणी प्रलंबित असलेल्या कामांबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले.
ही बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली असून, आगामी पावसाळा लक्षात घेता प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी उपविभागीय अधिकारीविश्वजित गाताडे,जिल्हा परिषद सदस्य रमेश सूद, पंचायत समिती सदस्य प्रसाद मोहरकर, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे,नायब तहसीलदार सरफरे, यांच्या सहित सर्व विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते.