जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा: राजापूरचे सर्वाधिक नुकसान
५७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान; १३ लाखांहून अधिकचा फटका
रत्नागिरी: गेले महिनाभर सातत्याने राहिलेल्या प्रतिकूल हवामानाचा आणि त्यानंतर सलग दोन दिवस गारांसह झालेल्या अवकाळी पावसाचा जिल्ह्यातील आंबा-काजू बागायतदारांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये राजापूर तालुक्याला सर्वाधिक फटका बसला असून इतर काही तालुके मात्र नुकसानापासून वाचले आहेत.
यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासूनच हवामान प्रतिकूल राहिले. सततचे धुके, थंडी आणि दिवसभरातील वाढता उष्मा यामुळे आंबा-काजू पिकांवर किडींचा, विशेषतः थ्रीप्सचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे उत्पादनात आधीच घट झाली होती. त्यातच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भर पडल्याने बागायतदारांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, गुहागर आणि रत्नागिरी या तालुक्यांमध्ये नुकसान झालेले नसताना, राजापूर तालुक्यातील ४२ शेतकऱ्यांचे २८.७० हेक्टर क्षेत्र बाधित होऊन सुमारे ६.४६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. लांजा तालुक्यातील १० गावांमध्ये २०.९० हेक्टर क्षेत्र बाधित होऊन ४.१७ लाख रुपयांचे नुकसान झाले, तर खेड तालुक्यातील ८ गावांतील ५५ शेतकऱ्यांचे ५.६५ हेक्टर क्षेत्र बाधित होऊन १.२८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, सलग दोन दिवस कोसळलेल्या अवकाळी पावसानंतर आज तिसऱ्या दिवशी वातावरणात काहीसा बदल जाणवला. दिवसभर स्वच्छ सूर्यप्रकाश आणि मोकळे आकाश असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी कृषी विभागाकडे करण्यात येत आहे.
दृष्टीक्षेपात नुकसान (लाख रुपयांत)
तालुकाबाधित गावेबाधित क्षेत्र (हे.)नुकसान मंडणगड ००.००० दापोली ००.००० खेड ८५.६५१.२८ चिपळूण ५२.१३०.४८ गुहागर ००.००० संगमेश्वर ७०.६००.१४ रत्नागिरी ००.००० लांजा १०२०.९०४.१७ राजापूर १०२८.७०६.४६ एकूण ३४५७.९८१३.०६