राजापूरात उघड्यावर मद्यप्राशन; ६ जणांवर गुन्हे दाखल
राजापूर:
राजापूर तालुक्यातील नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम राबवली आहे. ३ एप्रिल रोजी सकाळपासून रात्रीपर्यंत चाललेल्या या कारवाईत तबरेज चौक, धारतळे रोड आणि वाघेटी फाटा परिसरातून एकूण ६ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अटकेत असलेले बहुतांश आरोपी हे साखरी नाटे परिसरात खलाशी म्हणून काम करतात. हे सर्वजण पाण्याच्या बाटलीत दारू ओतून सार्वजनिक ठिकाणी पिण्यासाठी बसले असताना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले.
याप्रकरणी तबरेज चौक येथे हरी कुमार चौधरी (४७, कैलाली, नेपाळ), विकास लालू थारु (३१, बर्दिया, नेपाळ), जुनेद अली कलू अली डांगा (१९, उत्तर प्रदेश), नरेंद्र बुढीराम चौधरी (२५ कैलाली, नेपाळ), तर वाघेटी फाटा येथे राजकुमार हरिलाल थारु (४२ कैलाली, नेपाळ), पराग नारायण थारु (५३ कैलाली, नेपाळ) यांच्यावर कारवाई करण्यात आली.
नाटे सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल किरण विलास जाधव, पांडुरंग रंगराव पोवार आणि दत्तात्रय शिवाजी पाटील यांनी ही कारवाई केली. या सहाही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ प्रमाणे गु.र.नं. ३९, ४०, ४१, ४२, ४३ आणि ७५०५/२६ अंतर्गत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.