रत्नागिरीच्या तहसीलदारांची बदनामी; हातखंबा येथील एका विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल
रत्नागिरी:-
रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम नारायण म्हात्रे यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी, हातखंबा येथील एका व्यक्तीविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हातखंबा येथील रहिवासी परशुराम मारुती कदम यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी दावा केला होता की, खानू येथील योगिता यशवंत सुवारे यांचा धान्य लाभाचा अर्ज तहसीलदार कार्यालयात दोन वर्षांपासून प्रलंबित होता. मी स्वतः तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची भेट घेऊन त्यांना हे काम करण्यास सांगितले आणि त्यानंतरच म्हात्रे साहेबांनी ते काम केले. यासोबतच, भविष्यात कोणाचे काही काम अडल्यास मला संपर्क साधा, असे आवाहनही त्यांनी या व्हिडिओमध्ये केले होते.
तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी या व्हिडिओवर तीव्र आक्षेप घेतला आहे. हा व्हिडिओ लोकांमध्ये तहसीलदार कार्यालयातील कामकाजाविषयी संभ्रम निर्माण करणारा असून, यामुळे आपल्या पदाची प्रतिमा डागाळली गेली आहे आणि सामाजिक लौकिकास बाधा पोहोचली आहे, अशी तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात दिली.
या तक्रारीवरून रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी परशुराम कदम यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३५६(२) अन्वये अदखलपात्र गुन्हा (रजि. नं. ९१/२०२६) दाखल केला आहे. राजाराम नारायण म्हात्रे (वय ५३, तहसीलदार रत्नागिरी) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी तक्रारदाराला या प्रकरणी योग्य त्या न्यायालयात दाद मागण्याची समज दिली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सुर्वे करत आहेत.