रत्नागिरीत जागतिक ऑटिझम जागरूकता दिन उत्साहात; ‘आस्था’ सोशल फाउंडेशनतर्फे बस स्थानकावर जनजागृती
रत्नागिरी (प्रतिनिधी):
स्वमग्नता (ऑटिझम) असलेल्या मुलांच्या विकासासाठी समाजाचा स्वीकार आणि वेळेवर उपचार अत्यंत आवश्यक आहेत, असा संदेश देत २ एप्रिल रोजी ‘जागतिक ऑटिझम जागरूकता दिना’निमित्त ‘आस्था’ सोशल फाउंडेशनतर्फे रत्नागिरीत विशेष जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
रत्नागिरी बस स्थानक परिसरात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन कुमार आल्हाद सुरेखा पाथरे यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वसामान्य जनतेला स्वमग्नता म्हणजे काय, हे सोप्या भाषेत कळावे यासाठी चित्रांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले विशेष पोस्टर्स आणि माहिती पत्रके हे या उपक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.
लक्षणे ओळखा आणि वेळेवर उपचार घ्या: सुरेखा पाथरे
यावेळी मार्गदर्शन करताना आस्थाच्या सचिव सुरेखा पाथरे यांनी ऑटिझमच्या प्राथमिक लक्षणांवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, “जर मूल वयानुरूप बोलत नसेल, अतिशय चंचल असेल, स्वतःमध्येच मग्न राहत असेल किंवा इतर मुलांमध्ये मिसळण्यास टाळाटाळ करत असेल, तर पालकांनी याकडे दुर्लक्ष करू नये. अशा लक्षणांकडे वेळीच लक्ष देऊन तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास आणि लवकरात लवकर थेरपी उपचार सुरू केल्यास ही मुले वयानुरूप विकासाचे टप्पे गाठू शकतात.”
विविध सेवांची उपलब्धता
स्वमग्न बालकांसाठी ‘आस्था’ संस्थेमध्ये सर्व प्रकारचे समुपदेशन आणि थेरपी उपचार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच, जिल्हा शासकीय रुग्णालयातील ‘डीईआयसी’ (DEIC) विभागातही अशा मुलांसाठी शासकीय स्तरावर सेवा उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
समाज सहभागाचे आवाहन
या उपक्रमात सामाजिक कार्यकर्त्या श्रीम. विजेता मोर्ये यांनीही सहभाग नोंदवला. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी बस स्थानक आणि परिसरात प्रवाशांना माहिती पत्रके वाटून ऑटिझमबद्दलची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. ऑटिझम असलेल्या मुलांचा आपण सर्वांनी स्वीकार करून त्यांना प्रेम, आधार आणि समाजात सामावून घेणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या यशस्वी उपक्रमात संस्थेच्या हेल्पलाइन जिल्हा समन्वयक श्री. संकेत चाळके, थेरपी सेंटर प्रमुख श्रीम. संपदा कांबळे यांच्यासह संस्थेचे कार्यकर्ते, पालक आणि मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

