राजापुरात कामगाराचा झोपेतच मृत्यू
नाटे येथील घटना; आंबा शेडमध्ये मृतावस्थेत आढळला
राजापूर:
तालुक्यातील नाटे-कोकरीवाडी येथे एका आंबा शेडमध्ये काम करणाऱ्या ४० वर्षीय नेपाळी कामगाराचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सजू कल्लू चौधरी असे मृत कामगाराचे नाव असून, झोपेतच त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सजू चौधरी हा मूळचा नेपाळमधील कैलाली जिल्ह्यातील रहिवासी असून, तो नाटे येथील विनोद विश्वनाथ कुवेस्कर यांच्या आंबा बागेत मजुरीचे काम करत होता. ३० मार्च रोजी रात्री १०.४५ वाजता सर्व नेपाळी कामगार जेवण करून शेडमध्ये झोपायला गेले होते. सजू याला उशिरापर्यंत विडी ओढण्याची सवय असल्याने तो बराच वेळ जागा होता आणि त्यानंतर झोपला.
३१ मार्च रोजी सकाळी इतर कामगारांनी सजू याला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो कोणतीही हालचाल करत नव्हता. सहकाऱ्यांनी तातडीने मालक विनोद कुवेस्कर यांना याची माहिती दिली. कुवेस्कर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहिले असता सजू निपचित पडलेला दिसला.
वैद्यकीय तपासणी आणि पोलीस नोंद:
त्याला तातडीने धारतळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. माने यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
या प्रकरणी आमृ. क्रमांक १०/२०२६ आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये राजापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या कामगाराचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला की अन्य काही कारणाने, याचा तपास पोलीस करत आहेत.