रत्नागिरी पॅसेंजरसाठी खासदार राणे मैदानात
रत्नागिरी: कोकणातील सर्वसामान्य जनतेसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली रत्नागिरी पॅसेंजर दिव्याऐवजी दादर येथून सोडावी, अशी मागणी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी सविस्तर पत्र पाठवून स्थानिक नागरिकांच्या अडचणी मांडल्या.
१९९८ पासून सुरू असलेली पॅसेंजर कोविड काळात दादरऐवजी दिवा येथून सोडण्यास सुरुवात करण्यात आली होती; मात्र कोविड कालावधीत संपल्यानंतरही ही गाडी दादर येथून पुन्हा सुरू करण्यात आलेली नाही. सध्या ही गाड्या दिवा स्थानकातून रत्नागिरीकडे सोडली जात असली तरीही पश्चिम उपनगरात राहणाऱ्या कोकणवास्यांसाठी हा पर्याय अत्यंत गैरसोयीचा ठरत आहे.
पूर्वीप्रमाणेच दादर येथून ही गाडी सुरू व्हावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती; परंतु दादर-रत्नागिरी पॅसेंजर कायमची बंद करण्यात आल्याचे समोर येत आहे. त्या ऐवजी दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. ही पॅसेंजर ट्रेन विशेषतः गरीब, कामगार, विद्यार्थी, शेतकरी आणि लहान व्यावसायिकांसाठी स्वस्त आणि सोईस्कर प्रवासाचे प्रमुख साधन होते.
सध्याच्या एक्स्प्रेस गाड्यांचे वाढलेले भाडे सर्वसामान्यांना परवडत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रत्नागिरी, चिपळूण, खेड तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांचा रोजगार, शिक्षण व आरोग्याच्यादृष्टीने मुंबईशी सतत संपर्क असतो. त्यामुळे ही सेवा अत्यावश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. याबाबतचे पत्र खासदार नारायण राणे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना सादर केले आहे.
सर्वसामान्यांची गैरसोय
सध्या काही पर्यायी गाड्या कोकण रेल्वेमार्गावर उपलब्ध असल्या तरी त्या सर्वांसाठी सोईस्कर नाहीत. विशेषतः विद्यार्थी व रुग्णांना प्रवास करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच मासेमारी, आंबा आणि काजू व्यापारासारख्या स्थानिक व्यवसायांवरही या सेवेच्या बंदमुळे प्रतिकूल परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन तत्काळ पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी खासदार राणे यांनी केली.