राजापूर-लांजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस
आंबा-काजू बागायतदारांचे कंबरडे मोडले
राजापूर :: कोकणात हवामानात झालेल्या अचानक बदलामुळे राजापूर आणि लांजा तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. गुरुवारी दुपारनंतर आकाशात काळे ढग दाटून येत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. विशेषतः राजापूरमधील वाटुळ परिसरात आणि लांजा शहरात गारांचा वर्षाव झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून बळीराजा संकटात सापडला आहे.
सध्या आंबा आणि काजू हंगामाचा अत्यंत महत्त्वाचा काळ सुरू आहे. अनेक ठिकाणी झाडांवर आंबा तयार होण्याच्या प्रक्रियेत असतानाच निसर्गाचा हा फटका बसला आहे.
आंबा आणि काजू: गारांच्या माऱ्यामुळे राजापूरच्या वाटुळ परिसरात मोठ्या प्रमाणात आंबा गळती झाली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या मोडून नुकसानीची तीव्रता वाढली आहे.
पावसाच्या गारव्यामुळे आणि गारांमुळे भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. लांजा येथील बागायतदारांनी भीती व्यक्त केली आहे की, या पावसामुळे आंब्यावर रोगांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात मोठी घट होऊ शकते.
अचानक आलेल्या या पावसामुळे लांजा आणि राजापूर तालुक्यातील काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना पावसाच्या थेंबांनी तात्पुरता दिलासा दिला असला, तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी मात्र थांबलेले नाही.