लक्ष्मी ऑरगॅनिकचा’ झिरो डिस्चार्ज’चा दावा फोल
सांडपाण्याचा टँकर आंदोलकांनी पकडला
चिपळूण, ः लोटे एमआयडीसीतील वादग्रस्त ठरलेल्या लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीने सांडपाण्याचा एकही थेंब बाहेर जात नसल्याचा दावा केला होता. अखेर हा दावा आंदोलक तसेच ग्रामस्थांना फोल ठरवला. लोटे सीईपीटीत सांडपाणी प्रक्रीयेसाठी पाठवलेला टँकर आंदोलकांनी पाळत ठेऊन अडवला. आक्रमक झालेले परिसरातील ग्रामस्थ आणि आंदोलकांच्या पवित्र्याने सीईटीपीने हा टँकर पुन्हा लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीत पाठवला. टँकर अडवल्यानंतर लोटेत मोठा तणाव निर्माण झाला होता.
आरोग्यास घातक असलेले रसायन निर्मीती होत असल्याच्या कारणास्तव लक्ष्मी ऑरगॅनि विरोधात दोन महिने बेमुदत उपोषण सुरू आहे. या आंदोलनास परिसरातील ग्रामस्थांचा पाठींबा वाढत आहे. पीफास निर्मीती परिसरातील सांडपाणी घातक असून ते आरोग्यास अपायकारक असल्याचा आरोप आंदोलकांनी केला होता. त्यावर कंपनी प्रशासनाकडून सांडपाणी बाहेर सोडले जात नसल्याचे सांगितले होते. मात्र शुक्रवारी लक्ष्मी ऑरगॅनिकमधून प्रक्रिया केलेले पाणी टँकरद्वारे सीईटीपी येथे नेले जात असल्याची माहिती आंदोलक तसेच ग्रामस्थांना मिळाली. उपोषणस्थळी बसलेले पदाधिकाऱ्यांनी टँकरचा मागोवा घेतला. लोक आपल्या मागावर असल्याचे लक्षात येताच टँकर चालकाने सीईटीपी जवळ टॅकर न थांबवता तो पुढे आवाशी पर्यंत नेला. परंतू तेथेही पदाधिकारी पोहोचल्यानंतर चालकाने पुन्हा टँकर सीईटीपी प्रकल्पात आणला. तेथे आंदोलक पदाधिकाऱ्यांनी धडक देत विविध प्रश्नांचा भडीमार केला. या टँकरमधील पाणी नेमके कोणत्या प्रकारचे आहे, याबाबत सीईटीपी प्रशासन तसेच टँकर चालक कोणतीही ठोस माहिती देऊ शकले नाहीत. आंदोलकांचा पवित्रा पाऊन सीईटीपीने सदरचा टँकर पुन्हा कंपनीकडे परत पाठवला. संतप्त ग्रामस्थांनी संबंधित टँकर थेट लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीच्या गेटवर आणत निषेध नोंदवला. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर कंपनी प्रशासनाने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
गेल्या दोन महिन्यांपासून स्थानिक ग्रामस्थांकडून धरणे आंदोलन सुरू आहे. मात्र कंपनीकडून नियमांचे उल्लंघन करून लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. आजवर उत्पादनातून निर्माण झालेले वेस्टेज थेट सीईटीपीमध्ये टाकले जात आहे, असा आरोप आंदोलनकर्ते राजेंद्र आंब्रे यांनी केला.
तणाव निर्माण झालेला असतानाच प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आपले दोन कनिष्ठ कर्मचारी घटनास्थळी पाठवले. वरिष्ठ अधिकारी न आल्याने आंदोलक अधिक आक्रमक झाले. पीफास निर्मीतीनंरचे घातक पाणी सीईटीपीतून सोडले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. आजपर्यंत अशा प्रकारचे प्रक्रिया केलेले एकूण पाच टँकर सीईटीपीमध्ये सोडण्यात आल्याची माहिती सीईटीपीचे व्यवस्थापक भुषण शिंदे यांनी दिली.