रेल्वे विलीनीकरणाच्या मागणीवरून वादंग
वैभव खेडेकर यांचा ‘जल आंदोलनाचा’ इशारा
खेड: कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या विलीनीकरणाच्या हालचालींमुळे कोकणात संतापाची लाट उसळली आहे. कोकण रेल्वे ही केवळ वाहतुकीची सेवा नसून कोकणवासीयांच्या त्याग, स्वप्न आणि विकासाची जीवनवाहिनी असल्याने तिच्या अस्तित्वावर गदा येऊ नये, अशी ठाम भूमिका स्थानिकांकडून घेतली जात आहे.
स्वर्गीय मधु दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या दूरदृष्टीतून कोकणातील दुर्गम भागात रेल्वेचे स्वप्न साकार झाले. कठीण भौगोलिक परिस्थितीत उभारलेली ही रेल्वे कोकणवासीयांसाठी विकासाची नवी दिशा घेऊन आली. या प्रकल्पासाठी स्थानिकांनी आपल्या जमिनी अत्यल्प दरात दिल्या, ज्यामुळे हा ऐतिहासिक प्रकल्प शक्य झाला.
एकेकाळी केवळ ३५ रुपयांत कोकणातून मुंबईत पोहोचणे शक्य होते. १९९४ साली सुरू झालेली खेड-दादर पॅसेंजर आणि त्यानंतरची रत्नागिरी-दादर सेवा ही कोकणवासीयांसाठी मोठा दिलासा होती. मात्र, सध्या दादर स्थानकावरील कोकण रेल्वेचा थांबा काढण्यात आल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याऐवजी गोरखपूरकडे जाणाऱ्या गाड्यांना प्राधान्य दिल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे मध्य रेल्वेत विलीनीकरण करण्याची मागणी काही लोकप्रतिनिधींनी केली आहे. खासदार सुनील तटकरे यांच्यासह काही आमदारांनी ही मागणी केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या निर्णयामुळे कोकणातील प्रवाशांच्या सुविधांवर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.
कोकण रेल्वेने देशभरात उल्लेखनीय कामगिरी केली असून काश्मीरमधील चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल उभारण्यातही मोलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे अशा संस्थेचे विलीनीकरण करणे म्हणजे कोकणाच्या विकासाला धक्का देणारे ठरेल, असे मत व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपचे वैभव खेडेकर यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, कोकण रेल्वेच्या हक्कांवर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही. आवश्यक असल्यास जल आंदोलन उभारले जाईल. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना जाब विचारून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली जाईल.
कोकण रेल्वेचे अस्तित्व टिकवणे हेच कोकणवासीयांचे स्वप्न असून त्यासाठी आता संघर्षाची तयारी सुरू झाली आहे.