चिपळुणात प्लास्टिक गोदामाला भीषण आगीत इमारत भस्मसात
चिपळूण (प्रतिनिधी): तालुक्यातील नागावे नदीपात्राजवळ असलेल्या एका भंगार प्लास्टिक साठवणुकीच्या गोदामाला सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे संपूर्ण इमारत आगीच्या भक्षस्थानी पडली असून मोठी हानी झाली आहे. सुदैवाने, इमारतीत काम करणाऱ्या सहा कामगारांनी प्रसंगावधान राखत तातडीने बाहेर धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला असून त्यांचे प्राण वाचले आहेत.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पालांडे नामक व्यावसायिकाची ही जागा असून, पूर्वी तेथे डबर-खडी क्रशरचा व्यवसाय होता. तो बंद पडल्यानंतर ही जागा एका भंगार व्यावसायिकाला भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. या ठिकाणी भंगार प्लास्टिक पिशव्या स्वच्छ करून त्यापासून कच्चा माल तयार करण्याची प्रक्रिया राबवली जात होती. घटनेच्या वेळी तेथे सुमारे तीन ट्रक भरेल इतका प्लास्टिकचा प्रचंड साठा उपलब्ध होता. प्राथमिक माहितीनुसार, इमारतीच्या जवळच असलेल्या शेतातील वाळलेले गवत शेतीकामासाठी पेटवण्यात आले होते, मात्र कडक उन्हामुळे ही आग वेगाने पसरली आणि गोदामातील प्लास्टिक साठ्यापर्यंत पोहोचली, ज्यातून ही भीषण दुर्घटना घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, आग लागल्यानंतर यंत्रणांना माहिती देण्यास अर्धा तास विलंब झाल्याने आगीने अधिक उग्र स्वरूप धारण केले होते. घटनेची माहिती मिळताच महाजनको पोफळी येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले, मात्र पाण्याचा साठा अपुरा पडल्याने आग विझवण्यात सुरुवातीला अडथळे आले. त्यानंतर चिपळूण नगरपालिकेचा बंबही पाचारण करण्यात आला आणि दोन्ही दलांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी इमारतीसह प्लास्टिकचा साठा जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासन आता या आगीच्या नेमक्या कारणांचा अधिक तपास करत आहे.