कवितेच्या राजधानीत रंगणार कोमसापचा वर्धापन दिन सोहळा
रत्नागिरी:
कवी केशवसुतांची जन्मभूमी आणि साहित्यिकांनी गौरवलेली कवितेची राजधानी मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकामध्ये जेष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी स्थापन केलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेचा ३५ वा वर्धापन दिन यावर्षी २४ मार्च रोजी संपन्न होणार आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या वर्धापन दिन सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कोकण मराठी साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी व मान्यवर साहित्यिक मालगुंडनगरीत दाखल होत आहेत.
सोमवार दिनांक २३ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीची सभा व त्यानंतर स्नेहभोजन व रात्री ९ वाजता कोमसापच्या सभासदांसाठी असलेलं खुलं काव्यसंमेलन संपन्न होईल. दुसऱ्या दिवशी मंगळवार २४ मार्च रोजी सकाळी १० वाजता वर्धापन दिनाच्या उद्घाटन सोहळा संपन्न होईल, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्याला मान. नाम. उदयजी सामंत साहेब उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री रत्नागिरी तथा विश्वस्त कोमसाप हे उपस्थित असतील. त्यांच्या समवेत या कार्यक्रमासाठी मान. आमदार संजय केळकर (विश्वस्त कोमसाप) पोलीस अधीक्षक रत्नागिरी जिल्हा नितीन बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता किर, कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, विश्वस्त रेखाताई नार्वेकर, विश्वस्त एल बी पाटील सर, विश्वस्त अतुल कर्णिक, कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे, दीपा ठाणेकर, दक्षिण कोकण विभाग युवाशक्ती प्रमुख अरुण मोर्ये, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आनंद शेलार, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, रायगड जिल्हाध्यक्ष संजय गुंजाळ, मुंबई जिल्हाध्यक्ष विद्या प्रभू, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष मोहन भोईर, ठाणे जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर, पालघर जिल्हाध्यक्ष प्रविण दवणे व विविध समित्यांचे पदाधिकारी या कार्यक्रमाकरिता उपस्थित राहणार आहेत.
यावेळी कोमसापच्या जेष्ठ सभासदांचा सन्मान सोहळा, पुस्तक प्रकाशन, परिसंवाद, कोकण मराठी साहित्य परिषदेचा आजवरचा प्रवास यासंदर्भात चर्चासत्र व निमंत्रितांचे कवी संमेलन संपन्न होणार आहे.
प्रसिद्ध जेष्ठ कवी अशोक बागवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या निमंत्रितांच्या कवी संमेलनामध्ये कवी एल. बी. पाटील, कवी अरुण मोर्ये, कवी राष्ट्रपाल सावंत, कवी रूजारियो पिंटो हे मान्यवर कवी काव्य सादरीकरण करतील.
हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी कोमसाप शाखा मालगुंड व शाखा रत्नागिरीचे पदाधिकारी व स्मारक व्यवस्थापन समितीचे सदस्य मेहनत घेत आहेत.
तरी या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात येत आहे