रत्नागिरी जिल्हा न्यायालयातील लोक अदालतीमध्ये साडेसात कोटींची विक्रमी वसुली
रत्नागिरी
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार, रत्नागिरी जिल्हा व सर्व तालुका न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी ‘राष्ट्रीय लोकअदालत’ उत्साहात पार पडली. या लोकअदालतीला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, एकूण ३ हजार ९१८ प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात यश आले आहे. या माध्यमातून ७ कोटी ५२ लाख २४ हजार ५४५ रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद वाय. जाधव यांच्या हस्ते या वर्षातील पहिल्या राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन झाले. या लोकअदालतमध्ये न्यायालयातील ४ हजार १८४ प्रलंबित प्रकरणे आणि १७ हजार ९६३ वाद दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. यातील ३ हजार ९१८ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन वर्षानुवर्षांचे वाद कायमचे संपुष्टात आले. यावेळी वकील, पक्षकार आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग दिसून आला.
या लोकअदालतीमध्ये विविध प्रकारच्या दाव्यांवर सामोपचाराने तोडगा काढण्यात आला. यामध्ये प्रलंबित दिवाणी दावे आणि तडजोडपात्र फौजदारी खटले तसेच
धनादेश संबंधित खटले, बँका आणि पतसंस्थांची थकीत कर्जे, वैवाहिक समस्यांशी संबंधित प्रकरणे, नगरपालिका आणि ग्रामपंचायत पाणीपट्टी व घरपट्टी, थकीत वीजबिले आणि टेलिफोन बिले आदी विभागाची प्रकरणे निकाली काढण्यात आली.
ही लोकअदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील, सर्व न्यायाधीश आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. लोकअदालतीमुळे वेळेची आणि पैशांची बचत होत असल्याने नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतल्याचे दिसून आले.