खेड पंचनदी धरणाच्या काठावर १०-१२ फुटी महाकाय मगरीचे दर्शन
ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
संगलट: दापोली आणि खेड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पंचनदी धरण परिसरात आज सायंकाळी एका महाकाय मगरीने दर्शन दिल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. साधारण १० ते १२ फूट लांब असलेल्या या मगरीला पाहून प्रत्यक्षदर्शींच्या काळजाचा ठोका चुकला असून, धरण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. धरणाच्या काठावरील गाळसर भागात ही भलीमोठी मगर कोवळी उन्हे खाण्यासाठी शांतपणे बसली होती. नेहमीप्रमाणे शेतकरी आणि स्थानिक नागरिक या परिसरातून जात असताना काही शेतकऱ्यांच्या नजरेस हा प्रकार पडला.
व्हिडिओ आणि फोटोंमुळे मगरीची पुष्टी
सुरुवातीला मगरीचा अक्राळविक्राळ आकार पाहून अनेकांना ती हालचाल करत नसल्याचे वाटले. मात्र, स्थानिकांनी लांबूनच तिचे फोटो आणि व्हिडिओ काढले असता, मगरीच्या हालचालीवरून ती जिवंत असल्याची खात्री पटली. मगरीची जाडी आणि लांबी पाहता ती पूर्णतः वाढलेली असून अत्यंत धोकादायक स्थितीत काठावर आली होती. मगरीला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
स्थानिकांच्या मते, पंचनदी धरणात मगरींचा वावर अनेक वर्षांपासून आहे. मात्र, इतक्या मोठ्या आकाराची मगर मानवी वस्तीच्या इतक्या जवळ येणे ही चिंतेची बाब ठरत आहे. काळानुसार मगरींच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, धरणात आता मगरींचे साम्राज्य निर्माण झाले आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या परिसरात शेतकरी, पर्यटक आणि गुराख्यांची सतत ये-जा असते. अशातच ही महाकाय मगर बाहेर आल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने आणि वन विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन मगरींचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी पंचनदी परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.