केळ्ये ग्रामपंचायतीमध्ये महिला दिन उत्साहात साजरा, कर्तृत्ववान महिलांचा विशेष सन्मान
रत्नागिरी (प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यातील केळ्ये ग्रामपंचायतीमध्ये ८ मार्च २०२६ रोजी ‘जागतिक महिला दिन’ मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. सौरभी प्रदीप पाचकुडवे होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण सोहळा यशस्वीरित्या पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन करताना अध्यक्षांनी महिलांच्या अष्टपैलू प्रवासावर प्रकाश टाकला. महिला दिन हा केवळ एक उत्सव नसून तो स्त्रियांच्या अस्तित्वाचा, जिद्दीचा आणि सामर्थ्याचा गौरव करण्याचा दिवस असल्याचे त्यांनी नमूद केले. प्राचीन युगापासून ते आजच्या आधुनिक काळापर्यंत महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. घराच्या उंबरठ्यापासून ते आकाशात भरारी घेण्यापर्यंत प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे, अशा शब्दांत त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे समाजात वावरताना विधवा आणि परितक्त्या स्त्रियांना सन्मानाची वागणूक मिळावी, या उद्देशाने आयोजित केलेला विशेष सन्मान सोहळा. पतीच्या निधनानंतर खंबीरपणे कुटुंबाची जबाबदारी पेलणाऱ्या आणि पतीची साथ सुटल्यानंतरही अतोनात कष्टाने मुलांचे संगोपन करून त्यांच्या आर्थिक व भौतिक गरजा पूर्ण करणाऱ्या महिलांचे विशेष कौतुक करण्यात आले. अशा भगिनींना समाजात मानाचे स्थान आणि समानतेची वागणूक मिळावी, अशी आग्रही भूमिका याप्रसंगी मांडण्यात आली.
केळ्ये ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि कर्मचारी वर्गाच्या वतीने या कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात केवळ कौतुक सोहळाच नाही, तर महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि आरोग्य या विषयांवरही उपस्थितांनी सखोल मार्गदर्शन केले. बदलत्या काळात महिलांनी आपल्या आरोग्याप्रति जागरूक राहणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःची प्रगती साधणे किती गरजेचे आहे, हे या वेळी पटवून देण्यात आले.
या सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपसरपंच काशिनाथ बापत, ग्रामपंचायत सदस्य गजानन नाखरेकर, सदस्य राधिका कळंबटे, ग्रामपंचायत अधिकारी एस. आर. गोंडाळ, आरोग्य सेविका ज्योती सातघरे, ग्रामसंघ अध्यक्षा कौसर पावसकर, सचिव वीणा लिंगायत यांच्यासह सर्व बचत गटांच्या अध्यक्षा आणि गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचा समारोप उपस्थितांचे आभार मानून करण्यात आला. या उपक्रमामुळे केळ्ये परिसरात महिलांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
