रत्नागिरीत एसटीच्या चाकाला ‘तोट्याचा’ ब्रेक
दैनंदिन ९ लाख रुपयांचा होत आहे तोटा
रत्नागिरी:
कोकणच्या लालमातीतील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी समजली जाणारी ‘लालपरी’ सध्या भीषण आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडली आहे. रत्नागिरी एसटी विभागाला दररोज धावणाऱ्या गाड्यांच्या किलोमीटरगणिक होणाऱ्या नुकसानीमुळे प्रशासकीय पातळीवर चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रवाशांची मोठी संख्या असूनही हा वाढता तोटा भरून काढणे विभागासमोर मोठे आव्हान ठरत आहे.
रत्नागिरी विभागातून दररोज सुमारे २ लाख किलोमीटरचा प्रवास एसटी गाड्यांच्या माध्यमातून केला जातो. जिल्ह्याचा दुर्गम भौगोलिक विस्तार पाहता, आजही एसटी हाच सर्वसामान्यांसाठी एकमेव खात्रीशीर आधार आहे. मात्र, सध्या या प्रवासात गाड्यांना प्रत्येक किलोमीटरमागे ४.५० रुपये इतका तोटा सहन करावा लागत आहे. वरवर ही ४.५० रुपयांची रक्कम छोटी वाटत असली, तरी दैनंदिन २ लाख किलोमीटरच्या हिशोबात हा आकडा दररोज ९ लाख रुपयांच्या घरात जातो. म्हणजेच महिन्याकाठी विभागाला कोट्यवधी रुपयांचा तोटा सोसावा लागत आहे.
विभागाच्या या आर्थिक घसरणीमागे प्रामुख्याने डिझेलच्या दरात सातत्याने होणारी वाढ थेट उत्पन्नावर परिणाम करत आहे, जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे गाड्यांच्या सुट्या भागांची झीज वेगाने होत असून देखभाल-दुरुस्तीचा खर्च वाढला आहे, अनेक दुर्गम मार्गांवर प्रवासी संख्या कमी असूनही केवळ लोकसेवेसाठी गाड्या चालवाव्या लागतात, जिथे खर्च उत्पन्नापेक्षा जास्त होतो तसेच खासगी आणि अवैध प्रवासी वाहतुकीचा विळखा वाढल्याने एसटीच्या हक्काच्या रोख उत्पन्नात घट होत आहे प्रामुख्याने ही चार कारणे जबाबदार असल्याचे मानले जात आहे.
एसटी प्रशासनाकडून उत्पन्न वाढवण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. मात्र, हीच स्थिती कायम राहिली, तर भविष्यात नव्या गाड्यांचा पुरवठा, प्रवाशांच्या सोयी-सुविधा आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनावरही याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाच्या सवलतींमुळे प्रवासी संख्या दिसत असली, तरी विभागाच्या तिजोरीत जमा होणाऱ्या रोख रकमेत घट होत आहे.
आता या संकटातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार विशेष आर्थिक पॅकेज देणार की विभाग स्तरावर काही कठोर निर्णय घेतले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.