खेर्डी येथे ईर्टीगाची ट्रॅव्हलरला धडक
मुंबईच्या चालकावर गुन्हा दाखल
चिपळूण:
चिपळूण तालुक्यातील खेर्डी विकासवाडी रोडवरील आठवडा बाजार मैदानात शनिवारी रात्री एका भरधाव ईर्टीगा कारने उभ्या असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, चिपळूण पोलिसांनी ईर्टीगा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवार, ७ मार्च २०२६ रोजी रात्री ९:४५ वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबईतील गोरेगाव (पूर्व) येथील रहिवासी असलेला चालक रोहित संजय आगरे (वय ३१) हा आपल्या ताब्यातील ईर्टीगा कार (क्र. MH 47 AG 7369) घेऊन खेर्डी विकासवाडी परिसरातून जात होता.
यावेळी आठवडा बाजार मैदानात उभ्या असलेल्या फोर्स कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हलरला (क्र. MH 08 BK 0393) ईर्टीगा कारने मागून जोराची धडक दिली. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून गाडी चालवल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी अलोरे येथील रहिवासी आणि व्यावसायिक विनोद प्रकाश झगडे (वय ४८) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चालक रोहित आगरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, मोटार वाहन कायदा कलम १८४ या कलमान्वये गुन्हा रजिस्टर नंबर ६४/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र दोन्ही गाड्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.