सामान्यांचा कर वाढवण्यापेक्षा शासनाकडून निधी आणा: अमित विलणकर
रनपच्या नवीन करांना विरोध करणारे सेना ठाकरे गटाचे पत्र प्रशासनाला सादर
रत्नागिरी:
रत्नागिरी नगरपरिषदेच्या सन २०२६-२७ च्या मूळ अर्थसंकल्पावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या नवीन करांना सेना (ठाकरे गट) पक्षाच्या नगरसेवकांनी जोरदार विरोध दर्शवला असून, याबाबतचे अधिकृत पत्र प्रशासनाला सादर केले आहे. सामान्यांवर करांचा बोजा टाकण्यापेक्षा शासनाकडून निधी आणा,” अशी आक्रमक भूमिका ठाकरे गटाचे नगरसेवक अमित विलणकर घेतली आहे.
रत्नागिरी नगरपरिषदेच्या २०२६-२७ च्या मूळ अर्थसंकल्पाला आणि २०२५-२६ च्या सुधारित अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठी सोमवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या अर्थसंकल्पात नगरपरिषदेने आपली आर्थिक तूट भरून काढण्यासाठी अग्निशमन सेवा आणि स्वच्छता या दोन सेवांवर प्रत्येकी २ टक्के नवीन कर लागू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
नगरपरिषदेने महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियमातील कलमांचा आधार घेऊन हे कर प्रस्तावित केले असले, तरी ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी याला ‘जाचक करवाढ’ म्हटले आहे. गटनेते केतन उमेश शेट्ये, अमित वसंत विलणकर आणि फौजिया तनवीर मुजावर यांच्या स्वाक्षरीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
सामान्यांवर अशा प्रकारे अतिरिक्त करांचा बोजा टाकून आर्थिक तूट भरून काढणे चुकीचे आहे. जनतेच्या हितासाठी आम्ही या निर्णयाला कडाडून विरोध करत आहोत तसेच नगरपरिषदेने स्वतः कर लादण्यापेक्षा महाराष्ट्र शासनामार्फत अन्य उपाययोजना करून निधी उपलब्ध करावा अशा मागण्या निवेदनात केले आहे.
ऐन अर्थसंकल्पीय सभेत विरोधी पक्षाने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे सभेतील वातावरण चांगलेच रंगले. नागरिकांच्या खिशाला कात्री लावणारे हे कर मंजूर होणार की विरोधामुळे प्रशासन माघार घेणार, याकडे आता संपूर्ण रत्नागिरीकरांचे लक्ष लागले आहे.