आडीवरे येथे वडापाव गाड्याचे छप्पर तोडून जीवे मारण्याची धमकी
पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
राजापूर:
तालुक्यातील आडीवरे येथे रस्त्याच्या कामादरम्यान वडापाव गाड्याचे छप्पर बेकायदेशीरपणे तोडून नुकसान केल्याप्रकरणी आणि गाडा मालकास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २० फेब्रुवारी रोजी दुपारी घडली असून, शनिवारी रात्री याप्रकरणी नाटे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.
फिर्यादी संतोष गोपीनाथ आडीवरेकर (वय ५१), रा. आडीवरे वाडापेठ, यांचा आडीवरे येथे वडापाव विक्रीचा हातगाडा आहे. सध्या या परिसरात रस्त्याचे काम सुरू असल्याने, कामात अडथळा नको म्हणून त्यांनी आपला गाडा बाजूला काढला होता. मात्र, गाड्यावर असलेले छप्पर रस्त्यावरील कामगार, जेसीबी चालक किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारे अडथळा ठरत नव्हते, त्यामुळे ते छप्पर तसेच ठेवण्यात आले होते.
दिनांक २० फेब्रुवारी रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास आरोपी अक्षय अमर गुरव, अमर शंकर गुरव, सचिन संतोष गुरव, किरण धोंडू गुरव आणि किरण माने (सर्व रा. आडीवरे) यांनी संगनमत करून हे छप्पर बेकायदेशीरपणे तोडून टाकले आणि फिर्यादीचे आर्थिक नुकसान केले.
इतकेच नव्हे तर, फिर्यादी आडीवरेकर यांना “यापुढे येथे वडापाव गाडा लावून देणार नाही,” असे म्हणून अश्लील शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
पाच जणांवर विविध कलमान्वये गुन्हा
याप्रकरणी संतोष आडीवरेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १८९(२), १९१(२), १९०, ३२४(४), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.