सैतवडे परिसरात बिबट्याचा थरार: दोन आठवड्यांत दुसऱ्या वासराची शिकार
ग्रामस्थांमध्ये दहशतीचे सावट
रत्नागिरी : तालुक्यातील सैतवडे-बलभीम वाडी परिसरात बिबट्याने आपला मोर्चा पुन्हा एकदा पाळीव प्राण्यांकडे वळवला असून, काल रात्री एका वासराचा फडशा पाडल्याची घटना उघडकीस आली आहे. अवघ्या दोन आठवड्यांच्या अंतराने शिकारीची ही दुसरी घटना घडल्याने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. ‘वन विभाग एखाद्या मोठ्या अनर्थाची वाट पाहत आहे का?’ असा संतप्त सवाल आता ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सैतवडे येथील अशोक हिराजी सावंत यांच्या मालकीच्या वासराला पहाटेच्या सुमारास बिबट्याने लक्ष्य केले. या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला असून, घटनेची माहिती मिळताच परिसरात घबराट पसरली आहे. विशेष म्हणजे, आदल्या रात्री परिसरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या काही नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाल्याची चर्चा वाडीत रंगली आहे. कार्यक्रमाच्या गजबजाटातही बिबट्याचा वावर असल्याने तो आता माणसांना न घाबरता लोकवस्तीत घुसल्याचे स्पष्ट होत आहे.
येत्या दोन दिवसांवर कोकणचा लाडका सण ‘शिमगोत्सव’ येऊन ठेपला आहे. या उत्सवाच्या निमित्ताने वाड्या-वस्त्यांवर पालखी सोहळे, मेळे आणि रात्रीच्या वेळी लोकांची मोठी ये-जा असते. ग्रामीण भागात ग्रामस्थ रात्री उशिरापर्यंत घराबाहेर असतात. अशा परिस्थितीत बिबट्याचा वावर जीवघेणा ठरू शकतो. उत्सवाचा आनंद घेण्याऐवजी, ‘बाहेर पडायचे कसे?’ या विवंचनेत सध्या येथील नागरिक आहेत.
गेल्या १५ दिवसांतील ही दुसरी घटना असल्याने ग्रामस्थांचा संयम आता सुटत चालला आहे. वारंवार मागणी करूनही वन विभागाने अद्याप या भागात पिंजरा लावलेला नाही. “दोन निष्पाप जनावरांचा बळी गेल्यानंतरही प्रशासन योग्य उपाययोजना का करत नाही असा प्रश्न विचारत, प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नरभक्षक बिबट्याला जेरबंद करावे आणि परिसराला भयमुक्त करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
वेळेत उपाययोजना न केल्यास आणि भविष्यात एखादी मानवी जीवितहानी झाल्यास त्याला सर्वस्वी प्रशासनच जबाबदार असेल, असा इशाराही सैतवडे ग्रामस्थांनी दिला आहे.