राज्यभरातील 350 पेक्षा अधिक गड-किल्ल्यांवर एकाच वेळी ‘दुर्ग संवर्धन अभियान‘
रत्नागिरी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱया महाराष्ट्रातील गड-कोटांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत) आणि श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने एका व्यापक मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. 22 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यभरातील 350 पेक्षा अधिक गड-किल्ल्यांवर एकाच वेळी ‘दुर्ग संवर्धन अभियान‘ राबवण्यात येणार आहे.
गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाखाली ‘पर्यावरण-प्रकृती विभाग‘ अंतर्गत हे अभियान हाती घेण्यात आले आहे. या दिवशी राज्यभरातील हजारो महिला, पुरुष, सेवेकरी आणि भाविक आपापल्या भागातील किल्ल्यांवर जाऊन श्रमदान करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने किल्ल्यांची स्वच्छता करणे आणि तेथील देव-देवतांना मान-सन्मान देऊन पूजन करणे असे उपक्रम राबवले जातील.
या अभियानाद्वारे किल्ल्यांवरील ऐतिहासिक माहिती, पशु-पक्षी, दुर्मिळ वृक्ष-वेली आणि आयुर्वेदिक वनस्पतींची जैवविविधता यांची नोंद केली जाणार आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये ‘लोकजागरण‘ करून ग्रामस्थांचे प्रबोधन केले जाईल. नव्या पिढीपर्यंत स्वराज्याचा गौरवशाली आणि संघर्षाचा इतिहास पोहोचवणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे.
किल्ल्यांचे ‘गतवैभव‘ टिकवण्याचा प्रयत्न
साडेतीनशे वर्षांपूर्वी परकीय आणि जुलमी सत्तांच्या अन्यायातून रयतेची सुटका करण्यासाठी शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. या संघर्षात शिवनेरी, तोरणा, रायगड, सिंहगड, प्रतापगड यांसारख्या साडेतीनशेहून अधिक दुर्ग-कोटांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, आज या शक्तिस्थळांची अवस्था पाहून मन अस्वस्थ होते. ही ऐतिहासिक संपत्ती टिकवून ठेवण्यासाठी सेवा मार्गाने या अभियानाच्या माध्यमातून आपला खारीचा वाटा उचलण्याचा संकल्प केला आहे.
दुर्ग संवर्धन हे केवळ एका संस्थेचे काम नसून ते प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे या अभियानात केवळ सेवेक्रयांनीच नव्हे, तर जास्तीत जास्त दुर्गप्रेमी आणि सामान्य नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातर्फे करण्यात आले आहे.