भाजीपाल्याचा पिकअप टेम्पो दुभाजकाला धडकून उलटला
मुंबई-गोवा महामार्गावरील कोदवली येथील घटना
राजापूर:
मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील कोदवली, तरळवाडी येथे आज सकाळी भाजीपाला घेऊन जाणारा एक महिंद्रा बोलेरो पिकअप टेम्पो भीषण अपघातग्रस्त झाला. भरधाव वेगातील टेम्पो रस्त्याच्या दुभाजकाला धडकून पलटी झाल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. आरोपी चालक नईम इब्राहिम बागवान (वय ३८, रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) हा आपल्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो पिकअप (MH-51-C-5494) मधून भाजीपाला, फळे, कांदे आणि बटाटे भरून राजापूर येथील आठवडा बाजारासाठी येत होता.
कोदवली येथील तरळवाडी परिसरात आला असता, रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज न घेता चालकाने गाडी भरधाव वेगात आणि धोकादायकरित्या चालवली. यामुळे नियंत्रण सुटल्याने टेम्पो थेट महामार्गावरील दुभाजकाला जाऊन धडकला आणि रस्त्यावरच पलटी झाला. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आतील भाजीपाल्याचेही नुकसान झाले आहे.
याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रथमेश प्रकाश वारीक यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुपारी या घटनेची नोंद केली असून चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
अपघातामुळे महामार्गावर काही काळ भाजीपाला विखुरला होता, ज्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. राजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. आठवडा बाजारासाठी जाणारा माल वेळेत पोहोचण्यापूर्वीच हा अपघात झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.