संतोष थेराडे यांचा विजय म्हणजे जनसामान्यांच्या विश्वासाची मोहर
ॲड. दीपक पटवर्धन यांचे गौरवोद्गार
रत्नागिरी:
नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांनी नुकतीच स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. दीपक पटवर्धन यांच्या हस्ते थेराडे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या भेटीदरम्यान पटवर्धन यांनी थेराडे यांच्या राजकीय प्रवासाचे आणि मैत्रीचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संतोष थेराडे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत मिळवलेल्या दणदणीत विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करताना ॲड. दीपक पटवर्धन म्हणाले की, “हा विजय म्हणजे जनतेमधील एका निष्ठावंत कार्यकर्त्याला मतदारांनी दिलेला कौल आहे. संतोष थेराडे यांनी जनसामान्यांमध्ये आपले स्थान किती घट्ट केले आहे, हे या विजयाने अधोरेखित झाले असून त्यांच्या या यशाचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे.”
राजकीय भूमिकेपेक्षा वैयक्तिक स्नेहाला महत्त्व देत ॲड. पटवर्धन यांनी यावेळी भावोद्गार काढले. ते म्हणाले, “आमची मैत्री अनेक वर्षांची आहे. राजकारणात आमची मते किंवा भूमिका भिन्न असू शकतात, पण वैयक्तिक स्नेहाची भावना कधीही विरळ होणार नाही. आता निवडणूक संपली असून राजकीय संघर्षही मागे पडला आहे. यापुढे निखळ मैत्री जपत आपण पुढे जाऊ.”
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या या सत्काराने संतोष थेराडे भारावून गेले होते. ॲड. पटवर्धन यांनी थेराडे यांच्या जिल्हा परिषदेतील नव्या इनिंगसाठी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. या स्नेहमेळाव्यामुळे राजकीय वर्तुळात ‘मैत्री पलीकडे राजकारण’ या चर्चेला उधाण आले आहे.