कंटेनरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल
चिपळूण:
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सावर्डे येथील नायरा पेट्रोल पंपासमोर एक भीषण अपघात घडला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने रस्ता ओलांडणाऱ्या एका १७ वर्षीय मुलाला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, सावर्डे पोलिसांनी मध्यप्रदेशातील कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात १७ फेब्रुवारी रोजी घडला. फिर्यादी सुरेश बाळकृष्ण सावंत (वय ४६, रा. सावर्डे पोलीस लाईन) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संशयित चालक प्रांजल अजय दाहिया (वय २३, रा. सतना, मध्यप्रदेश) हा आपला कंटेनर (GJ 01 LT 9087) घेऊन मुंबईहून कणकवलीच्या दिशेने जात होता. सावर्डे येथील नायरा पेट्रोल पंपासमोर आले असता, त्याने आपल्या ताब्यातील वाहन अत्यंत हयगयीने, बेदरकारपणे आणि भरधाव वेगात चालवले. यावेळी रस्ता ओलांडणाऱ्या आनंद सुंदर हेम्ब्रम (वय १७) या मुलाला कंटेनरने जोराची धडक दिली.
या भीषण अपघातात आनंद हेम्ब्रम याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. आनंद हा मूळचा झारखंड (जि. गिरिडीह) राज्यातील असून, तो सध्या सावर्डे येथील नायरा पेट्रोल पंपाच्या पाठीमागे वास्तव्यास होता. केवळ १७ व्या वर्षी झालेल्या त्याच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सावर्डे पोलिसांनी याप्रकरणी तातडीने दखल घेत आरोपी चालक प्रांजल दाहिया याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १०६ (१) (बेदरकारपणे मृत्यूस कारणीभूत ठरणे), १२५ (अ), १२५ (ब), २८१ आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, १३४ (ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर मदत न करता पळ काढण्याच्या प्रयत्नाबाबतही कलमे लावण्यात आली आहेत.