रत्नागिरीत ‘लोकशाहीचा उत्सव’ शांततेत संपन्न
ईव्हीएम मशीन ‘स्ट्राँग रूम’मध्ये बंदिस्त, कडेकोट बंदोबस्त तैनात
रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित जिल्हा परिषदेच्या ५६ गटांसाठी आणि ९ पंचायत समिती गणांसाठीची मतदान प्रक्रिया अत्यंत उत्साहात आणि शांततेत पार पडली. जिल्ह्यामध्ये एकूण ५५.७९ टक्के मतदानाची नोंद झाली असून, आता सर्व उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये सीलबंद झाले आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण होताच, प्रशासनाकडून सर्व मशिनरी अत्यंत सुरक्षितपणे तालुकानिहाय निश्चित केलेल्या ‘स्ट्राँग रूम’मध्ये हलवण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी तालुक्यातील मतदानानंतर ईव्हीएम मशीनची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी त्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन’ येथील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या केंद्राला सध्या छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून, परिसरामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि सुरक्षेमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सुरक्षा कायम राखण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई आणि पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी आज स्वतः ‘स्ट्राँग रूम’च्या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सुरक्षेच्या व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला आणि उपस्थित कर्मचारी व पोलीस दलाला आवश्यक त्या सूचना दिल्या. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आणि २४ तास सशस्त्र पोलिसांचा पहारा अशा अभेद्य वेढ्यात या मशीन ठेवण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील ५५.७९ टक्के मतदानाची आकडेवारी पाहता, मतदारांनी आपला कौल कोणाला दिला आहे, याबाबत आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. तालुक्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, स्ट्राँग रूममधील ही सुरक्षा यंत्रणा आता निकालाच्या दिवसापर्यंत अशीच तैनात राहणार आहे. प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.