एसटी कंट्रोल रूममध्ये तोडफोड करणार्या तरुणावर गुन्हा दाखल
चिपळूण:
चिपळूण एसटी स्थानकावरील कंट्रोल रूममध्ये घुसून एका प्रवाशाने कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत तोडफोड केल्याची धक्कादायक घटना शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली. बसमधील गर्दीचा राग अनावर झाल्याने या प्रवाशाने चक्क सरकारी मालमत्तेचे नुकसान करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
चिपळूण एसटी स्थानकावर विनायक भास्कर कुसाळकर (वय ५५) हे वाहतूक नियंत्रक म्हणून आपल्या दालनात शासकीय कर्तव्य बजावत होते. सकाळी ७:२० वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्थानकाकडून आलेली एसटी बस प्रवाशांनी गच्च भरलेली होती. या बसमधून उतरलेल्या मंगेश मनोहर चव्हाण (वय २९, रा. भोम, ता. चिपळूण) या प्रवाशाला बसमधील गर्दीचा प्रचंड राग आला.
संतापलेल्या मंगेशने थेट कंट्रोल रूम गाठले आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना “गर्दी का झाली?” या कारणावरून अश्लील शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. कर्मचाऱ्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा पारा अधिकच चढला. रागाच्या भरात त्याने कंट्रोल रूमच्या दर्शनी भागातील काचेवर जोरात हात मारून ती फोडली. एवढ्यावरच न थांबता त्याने टेबलावरील संगणकाला जोराचा धक्का देऊन तो खाली पाडला, ज्यामुळे सरकारी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले.
या घटनेमुळे स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विनायक कुसाळकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिपळूण पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी मंगेश चव्हाणला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर भारतीय न्यायसंहिता २०२३ आणि सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंधक अधिनियमांतर्गत २२१, ३२४, ३५१(२), ३५२ आणि कलम ३ कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे: