चिपळूण तालुक्यात 50 मतदान केंद्रावर ईव्हीएम बिघाड
मतदान प्रक्रियेत मोठा गोंधळ
चिपळूण
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी चिपळूण तालुक्यात शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र सकाळपासूनच ईव्हीएम यंत्रांच्या सततच्या बिघाडामुळे संपूर्ण निवडणूक यंत्रणा अक्षरशः अडचणीत सापडली.
तालुक्यातील सुमारे 50 मतदान केंद्रांवर ईव्हीएम बंद पडल्याच्या तक्रारी आल्याने मतदान प्रक्रिया विस्कळीत झाली असून अनेक ठिकाणी मतदारांचा संताप व्यक्त होताना दिसून आला.
सकाळी 7.30 वाजता मतदानास सुरुवात झाली असली तरी काही केंद्रांवर यंत्र सुरूच न झाल्याने तासन्तास मतदारांना प्रतीक्षा करावी लागली. काही ठिकाणी पहिले यंत्र बंद पडल्यानंतर दुसरे, तर काही ठिकाणी तिसरे यंत्र बसवण्यात आले; मात्र तीही निकामी ठरल्याने दोन ते तीन तास मतदान रखडले. कळवंडे मतदान केंद्रावर तर दुपारी 12 वाजेपर्यंत एकही मत नोंदवले गेले नव्हते.
या गोंधळामुळे रांगेत उभे असलेले अनेक मतदार वैतागून माघारी परतल्याचे चित्र दिसून आले. परिणामी उमेदवार आणि राजकीय पक्षांमध्येही अस्वस्थता पसरली असून प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. सततच्या बिघाडामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची भीती व्यक्त केली जात होती,मात्र दुपारनंतर काही प्रमाणात प्रक्रिया सुरळीत झाल्याने सरासरी मतदान कायम राहिले.
दरम्यान, निवडणूक काळात तेंडली येथे भरारी पथकाने 68 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे निवडणूक वातावरणात आणखी खळबळ उडाली.
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 9 आणि पंचायत समितीच्या 18 अशा एकूण 27 जागांसाठी 245 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. मात्र ईव्हीएम बिघाडाच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पुढील टप्प्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा मतदारांकडून व्यक्त होत आहे.