लक्ष्मी ऑरगॅनिकसारखे प्रदूषणकारी प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही : एकनाथ शिंदे
चिपळूणमधील महायुतीच्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
चिपळूण : कोकणातील पर्यावरण आणि स्थानिक जनतेच्या भावना लक्षात घेता, लक्ष्मी ऑरगॅनिकसारखे प्रदूषणकारी उद्योग प्रकल्प चिपळूणसह कोकणात सुरू होऊ दिले जाणार नाहीत, असे मोठे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
चिपळूण येथे आयोजित महायुतीच्या जाहीर प्रचार सभेत बोलताना त्यांनी हा स्पष्ट इशारा दिल्याने कोकणवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कोकण हे निसर्गसंपन्न आणि पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र आहे. येथे उद्योग विकास आवश्यक असला तरी तो पर्यावरणपूरक आणि स्थानिकांच्या हिताचा असला पाहिजे. प्रदूषण वाढवणारे प्रकल्प मंजूर करून कोकणच्या आरोग्यावर आणि शेती-मत्स्यव्यवसायावर परिणाम होणार असेल, तर सरकार ते सहन करणार नाही.
लक्ष्मी ऑरगॅनिक प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य प्रदूषणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही काळापासून चिपळूण, खेड, लोटे परिसरात तीव्र विरोध सुरू होता. स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी संघटना आणि राजकीय पक्षांनी आंदोलन उभारले होते. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदेंच्या विधानाकडे विशेष महत्त्व दिले जात आहे.
कारवाई काय होणार? प्रश्न कायम
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडली असली, तरी पुढे या प्रकल्पावर नेमकी काय कारवाई पुढे या प्रकल्पावर नेमकी काय कारवाई होणार, परवानग्या रद्द होणार का, किंवा शासन स्तरावर कोणते आदेश निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, केवळ आश्वासन नको तर ठोस निर्णय हवा. कोकणातील पर्यावरण टिकवण्यासाठी प्रदूषणकारी प्रकल्पांवर कायमची बंदी घालावी, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
कोकणासाठी निर्णायक भूमिका?
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या या घोषणेमुळे महायुती सरकार कोकणातील पर्यावरण संवर्धनाबाबत गंभीर असल्याचा संदेश गेला आहे. मात्र या विधानानंतर प्रत्यक्ष निर्णय आणि कारवाई लवकरात लवकर झाली, तरच नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
या वेळी उद्योगमंत्री ना. उदय सामंत, गृहराज्यमंत्री ना. योगेशदादा कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजपनेते प्रशांत यादव व पदाधिकारी उपस्थित होते.