मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून रत्नागिरीतील तरुणाची ३६.६४ लाखांची ऑनलाईन फसवणूक
रत्नागिरी
क्रिप्टो करन्सीमध्ये कमी वेळात मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून रत्नागिरीतील एका तरुणाची तब्बल ३६ लाख ६४ हजार ७४० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फेसबुकवरील ओळखीतून विश्वास संपादन करून ही फसवणूक करण्यात आली असून, याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांचे शहरालगतच्या एमआयडीसी परिसरात दुकान आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची फेसबुक या समाजमाध्यमावरून सुहानी शर्मा हिच्याशी ओळख झाली. या ओळखीचा फायदा घेत सुहानी हिने तक्रारदारांचा विश्वास संपादन केला. तसेच आपला मित्र डॅनियल हा क्रिप्टो करन्सी मार्केटमधील ‘ट्रस्ट इन कॉइन’ या वेब ॲप्लिकेशनचा वरिष्ठ अकाऊंट मॅनेजर असल्याची बतावणी केली.
डॅनियल हा यूएसडीटी ट्रेडिंगच्या माध्यमातून कमी वेळात मोठा नफा मिळवून देतो, असे आमिष सुहानी हिने तक्रारदारांना दाखवले. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदारांनी डॅनियलशी संपर्क साधला. डॅनियलने व्हॉट्सॲपवर लिंक पाठवून ‘ट्रस्ट इन कॉइन’ या ॲप्लिकेशनमध्ये लॉगिन करण्यास सांगितले.
यानंतर २२ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत वेळोवेळी एकूण ३६ लाख ६४ हजार ७४० रुपये गुंतवणुकीसाठी जमा करून घेतले. मात्र गुंतवणुकीवर कोणताही परतावा न देता केवळ पैसे घेतले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याची जाणीव तक्रारदारांना झाली.
त्यानुसार त्यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलीसांनी डॅनियल आणि सुहानी शर्मा या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८, ३१९ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत कलम ६६(क) व ६६(ड) नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.