मिनी मंत्रालय; नेतृत्व घडवणारी ‘कार्यशाळा’
भास्कर जाधवांसह ५ नेत्यांचा जि.प. ते विधीमंडळात प्रवास
रत्नागिरी:
लोकशाहीमध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण करणाऱ्या जिल्हा परिषदेला ‘मिनी मंत्रालय’ म्हटले जाते. मात्र, रत्नागिरी जिल्हा परिषदेने केवळ ग्रामीण विकासच केला नाही, तर राज्याला दिग्गज नेतृत्व देणारी एक समर्थ ‘पाठशाळा’ म्हणूनही आपली ओळख निर्माण केली आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात राजकारणाचे धडे गिरवून आजवर पाच प्रमुख नेत्यांनी विधानसभेची आणि लोकसभेची पायरी चढली आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या इतिहासात अनेक अभ्यासू नेते झाले, परंतु पाच नेत्यांनी आपल्या कर्तृत्वाने वरिष्ठ सभागृहात स्थान मिळवले:
शिवाजीराव जड्यार हे जिल्हा परिषदेतून विधानसभेत जाणारे पहिले आमदार. १९७८ मध्ये ते जि.प. अध्यक्ष झाले. त्यांच्या कामाचा अनुभव पाहून काँग्रेसने १९८५ मध्ये त्यांना रत्नागिरी विधानसभेची उमेदवारी दिली. त्यांनी भाजपच्या शिवाजीराव गोताड यांचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला होता.
१९९२ मध्ये चिपळूणमधून शिवसेनेच्या तिकिटावर जि.प. मध्ये निवडून आलेले भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षनेते म्हणून सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडले होते. त्यांच्या या आक्रमकतेची दखल घेत ‘मातोश्री’ने १९९५ मध्ये त्यांना संधी दिली. गेली २० वर्षे ते आमदार असून, त्यांना ‘उत्कृष्ट संसदपटू’ म्हणून गौरवण्यात आले आहे. त्यांनी राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपदही भूषवले.
ग्रामपंचायत, पंचायत समिती सभापती आणि १९९८ मध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष असा प्रवास करणारे सुभाष बने हे एक अभ्यासू नेतृत्व आहे. २००४ मध्ये संगमेश्वर मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसच्या हुसेन दलवाई यांचा ३५ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता.
खेडचे संजय कदम यांनी तब्बल १५ वर्षे जि.प. सदस्य म्हणून काम केले. २००५ मध्ये ते उपाध्यक्ष झाले. २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत त्यांनी दापोलीचे शिवसेनेचे दिग्गज आमदार सूर्यकांत दळवी यांचा पराभव करून विधानसभा गाठली.
या पाठशाळेतून तयार झालेले गोविंदराव निकम यांनी केवळ विधानसभाच नव्हे, तर लोकसभेतही जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते.
ग्रामीण विकासात जिल्हा परिषदेचे महत्त्व आजही अबाधित आहे. जिल्हा परिषदेचा सदस्य हा थेट तळागाळातील लोकांशी जोडलेला असतो. त्यामुळेच जिल्ह्याच्या सत्ताकारणात जिल्हा परिषद ताब्यात मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये मोठी चढाओढ दिसते.