मंडणगड, चिपळूणमध्ये पोलिसांची दारूविरोधी कारवाई
दोघांवर गुन्हे दाखल
रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्ह्यात अवैध दारू विक्री विरोधात पोलिसांनी कंबर कसली असून, ३१ जानेवारी रोजी मंडणगड आणि चिपळूण परिसरात दोन स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या. या मोहिमेत पोलिसांनी देशी दारू आणि गावठी हातभट्टीचा साठा जप्त केला असून दोन जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ बौद्धवाडी येथे पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. आरोपी महेश नारायण कवडे (वय ४३) हा आपल्या घराच्या मागे असलेल्या आंब्याच्या झाडाच्या आडोशाला विनापरवाना देशी दारूची विक्री करत असताना मिळून आला.
पोलीस कॉन्स्टेबल विनय रमेश पाटील (मंडणगड पोलीस ठाणे यांच्या तक्रारीनुसार ३१ जानेवारी दुपारी ८८० रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसरी कारवाई चिपळूण तालुक्यातील भोपाळ कॉलनी परिसरात करण्यात आली. येथील जंगलमय भागात झाडीझुडपांचा आडोसा घेऊन गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री केली जात होती. अलोरे शिरगाव पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकून आरोपी अक्षय चंद्रकांत जोगळे (वय ३१, रा. कोळकेवाडी) याला ताब्यात घेतले.
पोलीस शिपाई दिलीप विठ्ठल जानकर (अलोरे शिरगाव पोलीस ठाणे) यांच्या तक्रारीनुसार ३१ जानेवारी, सायंकाळी ह्रे कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी ही मोहीम तीव्र केली असून, अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.