ठेवीदारांच्या अनमोल सहकार्याच्या बळावर स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेवींनी ओलांडली ४०० कोटींची वेस
रत्नागिरी : स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेवींनी आज ४०० कोटींचा ठेव टप्पा ओलांडला. गेली ३४ वर्ष ग्राहक सभासदांचा अतूट विश्वास आणि सहकार्याला पात्र ठरत स्वरूपानंद पतसंस्थेने कमालीचे सातत्य राखत आपले अर्थकारण वाढवत नेले आहे. ४८ हजार ग्राहक सभासदांपर्यंत आपल्या १७ शाखांच्या माध्यमातून आपल्या सेवांचा विस्तार वाढवत नेला आहे असे ॲड.पटवर्धन म्हणाले.
आज नववर्ष ठेव योजनेच्या अखेरच्या दिवशी ४०० कोटींच्या ठेवींची बिरुदावली संस्थेने साध्य केली. १ जानेवारी रोजी सुरू झालेल्या ठेव वृद्धीमासात स्वरूपानंदकडे ८ कोटी ५ लाखांच्या ठेवी संकलित झाल्या. ६३५ ठेव खात्यांच्या माध्यमातून या ठेवी नव्याने संकलित झाल्या. काल ३९९ कोटी १३ लाखांपर्यंत मजल मारली होती. आज महिना अखेरच्या दिवशी दुपारी २.०० वाजता ४०० कोटींचा टप्पा पार झाला. आज ५२ ठेवीदारांनी आपल्या ठेवी स्वरूपानंद पतसंस्थेत ४०० कोटींचे लक्ष पूर्ण करण्यासाठीचे योगदान म्हणून गुंतवल्या. हा प्रतिसाद लक्षणीय म्हणावा लागेल असे ॲड.पटवर्धन म्हणाले.
चालू आर्थिक वर्षांत स्वरूपानंद ५०० कोटींचा ठेव टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करणार असून ठेवीदारांना विश्वासार्ह सुरक्षित अर्थकारणाचे माध्यमातून आपलेसे करत शिस्त, नेटके, अचूक व्यवहार आणि प्रामाणिक ग्राहक सेवा या बळावर स्वरूपानंद पतसंस्थेचे चाललेले हे मार्गक्रमण समाजाच्या सर्व स्तरातून उत्तम प्रतिसाद प्राप्त करत आहे.
स्वरूपानंदने आपला संमिश्र व्यवसाय ६९३ कोटींच्या पल्याड पोहोचवला असून चालू आर्थिक वर्षात संमिश्र व्यवसाय ८०० कोटींची भरारी घेईल हा विश्वास ॲड.दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.
४०० कोटींच्या ठेव संकलनासाठी योगदान देणाऱ्या संस्थेच्या सर्व ठेवीदार सभासदांना मनःपूर्वक धन्यवाद देतांनाच विश्वासाचे हे नाते असेच अतूट राहून वृद्धिंगत होत जावे यासाठी स्वरूपानंद पतसंस्थेचे व्यवस्थापन कटीबद्ध असेल असे भावोद्गार ॲड.दीपक पटवर्धन यांनी काढले.