शिक्षक पात्रता परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना द्यावे लागणार प्रतिज्ञापत्र
जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने शिक्षक चिंतेत
रत्नागिरी
ज्या शिक्षकांना जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे कामकाज दिले आहे. परंतु, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीइटी) देणार आहेत, त्यांच्याकडून तसे प्रतिज्ञापत्र घ्यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. नव्या आदेशाने शिक्षक मात्र चिंतेत सापडले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या अनुषंगाने सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे आज आढावा बैठक घेतली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण विश्वजीत गाताडे, शिक्षणाधिकारी किरण लोहार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी तालुकानिहाय सविस्तर आढावा घेतला. निवडणुकीसाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ, उपलब्ध मनुष्यबळ, सीटीइटी परीक्षा, ती देणारे शिक्षक यांचा यात समावेश होता. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा देणारे जे शिक्षक आहेत, त्यांना परीक्षेसाठी कार्यमुक्त करताना परीक्षा देणार असल्याबाबत त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घ्यावे. त्यांच्या जागी मनुष्यबळ उपलब्ध करण्याबाबत कार्यवाही करावी. त्याबाबत नियोजन करावे. काही ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता वा अतिरिक्त मनुष्यबळ होत असल्यास त्याबाबत देखील सांगावे. नवीन अधिकारी-कर्मचारी नियुक्त करताना त्यांना प्रशिक्षण द्यावे. तसे नियोजन करावे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.