मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनरची कारला धडक; ५ जण जखमी
रत्नागिरी (प्रतिनिधी):
मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर कंटेनरने एका कारला मागील बाजूने जोरात धडक दिल्याची घटना ‘मौजे खान’ येथील हॉटेल देवभूमीसमोर घडली. या भीषण अपघातात कारमधील ५ प्रवासी जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
दिनांक १ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास आरोपी चालक इलियास अकबर हाजु (वय ४८, रा. लांजा) हा आपला आयशर कंटेनर (क्र. GA 05 T 6053) घेऊन मुंबई-गोवा हायवेवरून जात होता. मौजे खान येथे पोहोचल्यावर चालकाने कंटेनर अतिवेगात आणि बेदरकारपणे चालवून पुढे जाणाऱ्या कारला (क्र. MH 05 CH 3123) मागील बाजूने जोरदार धडक दिली.
या अपघातात शौकत अल्लीसाहेब रखांगी (५०, रा. लांजा), सईद नुर खान (४०, रा. लांजा), दिलशाद रफिक नाईक (६५, रा. लांजा), सना सईद खान (३७, रा. लांजा), साकिब सईद खान (१३, रा. लांजा) हे पाच जखमी झाले.
याप्रकरणी महिला पोलीस हवालदार तृप्ती रविकांत सावंतदेसाई यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, चालक इलियास हाजु याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.