खेड मंडणगड मार्गावर पोलिसांची मोठी कारवाई; दापोलीतील तरुणाकडून ७० जिवंत गावठी बॉम्ब जप्त
रत्नागिरी : जिल्ह्यात बेकायदेशीर स्फोटक पदार्थांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेला मोठे यश आले असून, खेड-मंडणगड रस्त्यावर ७० जिवंत गावठी बॉम्बसह एका संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) अटक केली आहे. प्रकाश राम जगताप (वय ३३ वर्षे, रा. शिरखल, ता. दापोली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून स्फोटकांसह एक चारचाकी वाहन असा एकूण २ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध स्फोटकांविरुद्ध कठोर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, बुधवारी २८ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक खेड उपविभागामध्ये पेट्रोलिंग करत असताना, सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास मौजे मुगीज येथे एक इसम संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे सार्वजनिक सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण करणारे ७० जिवंत गावठी बॉम्ब आढळून आले.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात भारतीय स्फोटक कायदा १९०८ चे कलम ५ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत बोरकर, विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, दिपराज पाटील, सत्यजित दरेकर आणि अतुल कांबळे यांच्या पथकाने केली. जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती ‘डायल ११२’ वर त्वरित द्यावी, असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.