आमदार जाधव ‘स्थानिक’ निवडणुकीतून अलिप्त
चिपळूण: चिपळूण पालिका निवडणुकीत आमदार भास्कर जाधव यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात माजी खासदार विनायक राऊत यांनी निर्णय घेतला. त्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार पराभूत झाले. त्यामुळे भास्कर जाधव यांनी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून अंग काढले आहे. त्यांनी केवळ गुहागर तालुक्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्याचा फटका ठरे गटाच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे.
चिपळूण पालिका निवडणुकीत आमदार भास्कर जाधव यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली होती आणि शहरातील काही जागा पदरात पाडून घेतल्या होत्या. तसेच नगराध्यक्षपदासाठी माजी आमदार रमेश कदम यांना पाठिंबा दिला होता; परंतु भास्कर जाधव यांच्या निर्णयाविरोधात विनायक राऊत यांनी निर्णय घेत सर्वच जागांवर उमेदवार उभे केले आणि नगराध्यक्षपदासाठीही उमेदवार दिला. विनायक राऊत उमेदवारांच्या प्रचारासाठीही आले नाहीत. त्यांनी नगराध्यक्षपदासाठी दिलेल्या उमेदवाराला जेवढी मते पडली तेवढ्याच मताने रमेश कदम यांचा पराभव झाला. त्यामुळे विनायक राऊत यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार का दिला? हे अनेकांच्या लक्षात आल्यानंतर काठावर पराभूत झालेले आणि राऊतांच्या निर्णयातून नाराज झालेल्या ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी पक्ष सोडण्यास सुरुवात केली आहे. तसेच भास्कर जाधव यांनीही जिल्ह्यातील राजकीय प्रक्रियेतून बाजूला होण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी विनायक राऊत यांनी चिपळूणचा दौरा केला. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका जाधवांच्या नेतृत्वाखाली होतील, असे राऊत यांनी स्पष्ट केले; मात्र गुहागरमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय असलेले भास्कर जाधव जिल्ह्यात कुठेही प्रचारात सक्रिय नसल्याचे दिसले. त्यांना मानणारे जिल्ह्यातील कार्यकर्ते त्यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन आशीर्वाद घेत आहेत.