विरोधकांनी पराभव मान्य करावा: ना. उदय सामंत
रत्नागिरी: राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी आज विविध राजकीय मुद्द्यांवरून विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांच्या रणनीतीपासून ते राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांपर्यंत सामंत यांनी सडेतोड भाष्य करत महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना उदय सामंत म्हणाले की, “सध्या उद्धव ठाकरे यांची अवस्था ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी झाली आहे. निवडणुकांमध्ये पराभव झाला आहे हे त्यांनी आता मान्य करायला हवे.
मनसे संदर्भात बोलताना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. “मी आधीच म्हणालो होतो की उद्धव ठाकरे यांची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, आणि तेच घडले आहे. याचे परिणाम आता कल्याण-डोंबिवलीत दिसू लागले आहेत, ही तर फक्त सुरुवात आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.
राऊत आणि वडेट्टीवार यांच्यावर बोचरी टीका
संजय राऊत यांच्या प्रश्नांमध्ये काहीही तथ्य नसते, त्यामुळे आम्ही केवळ विधायक गोष्टींवर बोलू, असे सांगत सामंत यांनी राऊतांना ‘पुढील २५ वर्षे विरोधी पक्षातच बोलत राहा’ असा टोला लगावला.
तसेच, विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधताना सामंत म्हणाले, “सनसनाटी बातम्या द्यायच्या असतील तर असंबंध बोलणे आवश्यक असते आणि त्यात वडेट्टीवार अग्रेसर आहेत. नगरसेवकांना पैसे कोण देतोय हे त्यांनी आधी स्वतःच्या पक्षात तपासावे. काँग्रेसमध्ये दोन गट असून, कदाचित दुसऱ्या गटाचे पैसे या नगरसेवकांना दिले जात असतील.”
काँग्रेसच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना सामंत यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले. “काँग्रेस ९० निवडणुका हरली आहे, अशा हरलेल्यांना मी मोठे करणार नाही. भारतात जेव्हा निवडणुका असतात, तेव्हा राहुल गांधी परदेशात असतात. त्यामुळे काँग्रेसला गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही,” असे ते म्हणाले.
महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत सामंत यांनी महायुतीचाच विजय होईल असा दावा केला.
मुख्यमंत्री आज महाराष्ट्रात परतणार असून, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांच्यात चर्चा होईल. त्यानंतर महानगरपालिके संदर्भातील घोषणा लवकरच होईल.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर महायुतीचाच भगवा फडकणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोलापूर जिल्हा परिषद दोन शिवसेना एकत्र येण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
रत्नागिरीतील उपनगराध्यक्ष धमकी प्रकरणावर सामंत यांनी सावध भूमिका घेतली. “मी सर्व नगरसेवकांशी बोलेन आणि दोन्ही बाजू ऐकून घेईन. जर या प्रकरणात अधिकारी दोषी आढळले, तर त्यांची बदली आणि त्यांच्यावर कडक कारवाई नक्कीच केली जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.