गणपतीपुळे येथे माघी यात्रेला भाविकांचा जनसागर
श्रींच्या दर्शनासह यात्रेच्या खरेदीचा स्थानिकांनी घेतला मनसोक्त आनंद
रत्नागिरी: तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे गुरुवारी (२२ जानेवारी) माघी यात्रा उत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा झाला. ही यात्रा स्थानिकांची यात्रा म्हणून ओळखली जात असल्याने यंदाही भाविकांचा प्रचंड जनसागर उसळला होता. हजारो स्थानिक भाविकांनी श्री गणरायांचे दर्शन घेतल्यानंतर यात्रेतील विविध वस्तूंच्या खरेदीचा आनंद घेतला.
माघी यात्रेनिमित्त गणपतीपुळे, भंडारपुळे, नेवरे, कोतवडे, मालगुंड, वरवडे, भगवतीनगर, खंडाळा, जयगड, जाकादेवी यांसह संपूर्ण रत्नागिरी तालुका व जिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. मंदिरातील दर्शनासाठी भाविकांनी शिस्तबद्धपणे रांगा लावून श्रींचे दर्शन घेतले. त्यानंतर यात्रास्थळी उभारण्यात आलेल्या विविध दुकानांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले.
माघी यात्रेच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे देवस्थान समितीने अत्यंत नेटके नियोजन केले होते. पहाटे पाच वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. प्रारंभी मुख्य पुजारी अमित घनवटकर यांच्या हस्ते श्रींची पूजा-अर्चा, मंत्रपुष्प व आरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला.
गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था व पार्किंगची योग्य सोय करण्यात आली होती. तसेच मंदिर परिसर, समुद्रकिनारा व यात्रेच्या गर्दीच्या ठिकाणी जयगड पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या यात्रेनिमित्त सांगली जिल्ह्यातील माघी गणेश मंडळाच्या वतीने भाविकांसाठी मोफत महाप्रसाद व बुंदी लाडूचे वाटप करण्यात आले. हजारो भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला. भाविकांची वाढलेली गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाकडून गणपतीपुळे मार्गावर जादा एसटी बसची व्यवस्था करण्यात आली होती, त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.
यात्रेसाठी जिल्ह्यातील तसेच घाटमाथ्यावरील अनेक व्यापारी विविध वस्तूंची दुकाने घेऊन गणपतीपुळ्यात दाखल झाले होते. त्यामुळे भाविकांना आवश्यक वस्तूंची खरेदी करता आली आणि यात्रेला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले.
सायंकाळी साडेचार वाजता गणपती मंदिराच्या प्रदक्षिणामार्गे श्रींची पालखी मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत मोठ्या थाटात काढण्यात आली. या मिरवणुकीत देवस्थानचे सरपंच निलेश कोल्हटकर, ग्रामपंचायत सदस्य, पुजारी, कर्मचारी, पोलीस बांधव, स्थानिक ग्रामस्थ, भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला.
एकूणच माघी यात्रा उत्सव भक्तिभावात, शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी देवस्थान समिती, ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाने विशेष परिश्रम घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले.