मनाला योग्य दिशा देण्यासाठी मनशक्तीची गरज:वैदेही रानडे
‘ यश शांतीसाठी न्यू वे’ उपक्रमाचे उद्घाटन संपन्न
रत्नागिरी
मोबाईल, इंटरनेटच्या जमान्यात माणूस स्वतःचे अस्तित्वच विसरत चालला आहे. मनशांती हरवत चालला आहे.अशावेळी स्वतःच्या मनाला योग्य दिशा देण्यासाठी ‘ मनशक्ती’ सारख्या माध्यमाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले.
शहरातील स्वा.सावरकर नाट्यगृहात , मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळे आणि स्थानिक केंद्र रत्नागिरी तर्फे आयोजित ‘ यश शांतीसाठी न्यू वे’ या दोन दिवसीय विनामूल्य उपक्रमाचा उद्घाटन सोहळा बुधवारी (ता.२१) संपन्न झाला. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात वैदेही रानडे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरीच्या नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे,मनशक्ती प्रयोगाकेंद्राचे प्रमुख विश्वस्त प्रमोदभाई शिंदे, जीवनदानी साधक मयूर चंदने, रत्नागिरी केंद्राचे ज्येष्ठ साधक राजन नाईक, राजश्री मालुष्टे उपस्थित होते. यावेळी आशा सेविका,नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी , विविध शाळांचे विद्यार्थी,युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना वैदेही रानडे यांनी सांगितले, की
नवीन पिढीला अपील होईल अशी टॅग लाईन असलेला ‘ यश शांतीसाठी – न्यू वे’ हा मनशक्ती प्रयोग केंद्राचा उपक्रम खरोखरच विज्ञानाधिष्ठित आहे. जन्मपूर्वपासून ते शेवटापर्यंत विविध स्तरावर माणसाच्या उपयोगी पडणारे वेगवेगळ्या विषयांवरचे विवेचन सत्र या दोन दिवसीय विनामूल्य उपक्रमांमध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत.या विवेचनांच्या जोडीला मनाची शक्ती, एकाग्रता याचे मोजमाप करणारे, मेंदूला चालना देणारे एवढेच नव्हे तर स्वतःला काहीतरी वेगळं करायचंय याची कुठेतरी मनामध्ये भावना निर्माण करणारे विविध वैज्ञानिक प्रयोग देखील मांडण्यात आलेले आहेत. सामान्यपणे आपण गर्भवती माता आणि तिच्या पोटातील बाळाच्या केवळ शारीरिक पोषणाचा विचार करतो. परंतु या बाळाच्या आणि मातेच्या मनाचा देखील विचार व्हायला पाहिजे, तो मनशक्तीने केलेला आहे. मनशक्तीचे विज्ञानाधिष्ठित कार्य तब्बल पन्नास वर्षे यशस्वीपणे चालू आहे, यामध्येच या संस्थेच्या सर्व उपक्रमांचे महत्त्व आणि यश अधोरेखित होते. आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तणावाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच मोबाईलच्या जमान्यात सर्वजण मनशांती हरवत चालले आहेत. अशावेळी मनशक्तीच्या या उपक्रमांमधील आपला सहभाग आपल्या मनाला निश्चितच योग्य दिशा देण्याचे काम करेल, असा विश्वास श्रीमती रानडे यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे यांनी सांगितले ,की
विज्ञानाने खूप प्रगती केली. विविध तंत्रज्ञान विकसित केले. तरीसुद्धा माणूस आतून अस्वस्थच आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात मन शांत नाही. अस्थिर आहे. या अस्थिर मनाला शांत करण्यासाठी लोणावळा येथील मनशक्ती केंद्र चांगले काम करत आहे.आज केवळ मोठ्या माणसांनाच नव्हे तर लहान विद्यार्थ्यांना सुद्धा प्रचंड ताण आहे. सर्वजण तणावाखाली आहेत.हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मनाला शांत करण्याची आवश्यकता आहे. यासाठी मनशक्तीचे उपक्रम समाजाला दिशा देणारे आहेत. एक नगराध्यक्ष म्हणून मला देखील या मनशक्तीची निश्चितच गरज आहे. मनशक्ती पाठीशी असेल तर आम्ही सुद्धा खूप काही करू शकतो, विश्वास व्यक्त करत आजचा विद्यार्थी हा देशाचे भविष्य आहे. त्यामुळे मनशक्तीचे हे उपक्रम सर्व शाळांमधून पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करूया असे आवाहन देखील शिल्पा सुर्वे यांनी यावेळी केले.
दरम्यान ,प्रास्ताविकामध्ये बोलताना मनशक्ती केंद्राचे विश्वस्त प्रमोदभाई शिंदे यांनी सांगितले, की
‘ यश शांतीसाठी न्यू वे’ या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा रत्नागिरीमध्ये संपन्न होत आहे. रत्नागिरी ही विचारवंतांची भूमी आहे. या भूमीने भारतमातेसाठी लोकमान्य टिळकांपासून अनेक सुपुत्र दिलेले आहेत.त्यांच्या विचारांचा आदर्श आजही आपण बाळगत आहोत. ज्या सभागृहात हा कार्यक्रम सुरू आहे ते सभागृहही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचेच आहे. या सर्वांनी आपले आयुष्य देशासाठी समर्पण करेन अशी प्रतिज्ञा बालपणीच घेतलेली होती. या थोर विचारवंतांच्या भूमीमध्ये मनशक्तीचा हा उपक्रम होत आहे. लहान मुलांपासून तरुण, प्रौढ सर्वांनाच रोजच्या धकाधकीच्या जीवनात मनाला शांती हवी असते. ती कशी मिळवायची याचे विज्ञान शुद्ध मार्गदर्शन मनशक्तीने विविध उपक्रमाच्या माध्यमातून केले आहे. विविध विवेचनांबरोबरच माईंड जिम सारखा भव्य प्रकल्प देखील मनाशक्तीने रत्नागिरीत आणलेला आहे. विविध सुमारे २०० ग्रंथ, प्रयोगात्मक साहित्य याचे प्रदर्शन देखील या उपक्रमात मांडलेले आहे. रत्नागिरीकरांना ज्ञान प्रेरित करण्याची इच्छा बाळगून हा उपक्रम घेण्यात आलेला आहे. व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र आणि संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचा विशाल दृष्टिकोन बाळगून सुरू असलेल्या या उपक्रमाचा लाभ रत्नागिरीकरांनी घ्यावा असे आवाहनही शिंदे यांनी यावेळी केले.