रत्नागिरी पालिकेचा पैसा ‘पाण्या’सारखा वाया
फ्लोटिंग पंपांच्या वीजबिलापोटी आतापर्यंत पाऊण कोटी खर्च; नव्या सत्ताधाऱ्यांसमोर ‘शीळ’चा पाणीप्रश्न
रत्नागिरी:
शीळ जॅकवेल कोसळल्यानंतर उद्भवलेल्या पाणीप्रश्नावर तात्पुरता उपाय म्हणून बसवण्यात आलेले फ्लोटिंग पंप आता रत्नागिरी नगरपालिकेसाठी ‘पांढरा हत्ती’ ठरत आहेत. केवळ ११०० मीटरची पाईपलाईन पूर्ण न झाल्यामुळे गेल्या तीन वर्षांत पालिकेला सुमारे ७५ लाख रुपये केवळ वीजबिलापोटी मोजावे लागले आहेत. पालिकेची आर्थिक स्थिती आधीच नाजूक असताना, या उधळपट्टीमुळे संताप व्यक्त होत असून नव्या सत्ताधाऱ्यांनी हे काम प्राधान्याने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
सुधारित पाणी योजनेमध्ये शीळ धरण ते जॅकवेलपर्यंत सुमारे ११०० मीटरची पाईपलाईन टाकणे समाविष्ट होते. शीळ धरणातून नैसर्गिक उताराने हे पाणी जॅकवेलपर्यंत येऊ शकते. मात्र, तीन वर्षे उलटूनही अद्याप केवळ ४९९ मीटर पाईपलाईन टाकून झाली आहे. उर्वरित ६११ मीटरचे काम अद्यापही रेंगाळलेलेच आहे. हे काम वेळीच पूर्ण झाले असते, तर विद्युत पंपांची गरज भासली नसती आणि जनतेचा पैसा वाचला असता.
सध्या पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नदीवर ६ फ्लोटिंग पंप बसवण्यात आले आहेत. त्यापैकी ४ पंप २४ तास सुरू असतात, तर २ पंप पर्यायी म्हणून ठेवले जातात. या पंपांचे महिन्याचे वीजबिल अंदाजे २ लाख रुपये येते. गेल्या तीन वर्षांचा हिशोब केल्यास पालिकेने आतापर्यंत साधारण पाऊण कोटी रुपये केवळ बिलापोटी खर्च केले आहेत.
फ्लोटिंग पंपांवर अवलंबून राहणे केवळ खर्चिकच नाही, तर धोकादायकही आहे. पावसाळ्यात शीळ नदीला पूर आल्यास हे फ्लोटिंग पंप वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास शहराचा पाणीपुरवठा पुन्हा एकदा विस्कळीत होऊ शकतो. ही टांगती तलवार कायम असतानाही प्रशासकीय स्तरावर पाईपलाईन पूर्ण करण्यासाठी अपेक्षित हालचाली होताना दिसत नाहीत.
रत्नागिरी पालिकेवर आता शिवसेना-भाजप महायुतीची नवी सत्ता प्रस्थापित झाली आहे. पालिकेवर आधीच ४३ कोटी रुपयांचे देणे असून तिजोरीची अवस्था बिकट आहे. अशा परिस्थितीत दर महिन्याला होणारा २ लाखांचा नाहक खर्च वाचवणे हे नव्या पदाधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान आहे. ६११ मीटर पाईपलाईनचे काम पूर्ण करून हा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी नवे सत्ताधारी काय निर्णय घेतात, याकडे रत्नागिरीकरांचे लक्ष लागले आहे.