एलटीटी-करमळी विशेष गाडीला १२ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गर्दीचा ताण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय; साप्ताहिक गाडी धावणार
चिपळूण: कोकण रेल्वेमार्गावर वाढती गर्दी आणि नियमित गाड्यांवरील ताण लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते करमळी या साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसला १२ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी पूर्वी १५ जानेवारीपर्यंतच चालवण्यात येणार होती, मात्र प्रवाशांच्या मागणीमुळे महिनाभर ही सेवा वाढवण्यात आली आहे.
नाताळ आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने सुरू केलेली ही विशेष गाडी मुंबई-गोवा प्रवाशांसाठी अत्यंत सोयीची ठरत आहे.
एलटीटी ते मडगाव एक्स्प्रेस दर गुरुवारी रात्री १२.५० वाजता सुटून सकाळी ११.१५ वाजता मडगावला पोहोचते. तिचा परतीचा प्रवास दुपारी १.४० वाजता सुरू होऊन दुसऱ्या दिवशी रात्री १२.१० वाजता एलटीटीला पोहोचते. या रेल्वे गाडीला ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, करमळी आणि मडगाव हे प्रमुख थांबे आहेत.
अस्वच्छता आणि विलंबाच्या तक्रारी कायम
ही गाडी प्रवाशांसाठी सोयीची असली तरी, तिच्या सेवेबाबत अनेक तक्रारी समोर येत आहेत. ही रेल्वेगाडी अनेकदा उशिराने धावते. तसेच डब्यांमधील अस्वच्छता आणि शौचालयात पाणी नसणे, अशा समस्यांमुळे प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. प्रशासनाने मुदतवाढीसोबतच या सुविधांकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.