कोकणातील १,१९८ ग्राहकांनी घरबसल्या बदलले वीजबिलावरील नाव
रत्नागिरी-सिंधुदुर्गातील ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; भारवाढीसाठीही ‘स्वयंचलित मंजुरी’ची सुविधा
रत्नागिरी:
महावितरणने आपल्या सेवांचे डिजिटायझेशन करण्यावर भर दिला असून, त्याचा मोठा फायदा कोकणातील ग्राहकांना होत आहे. वीजजोडणीनंतर नावात बदल करण्यासाठी आता कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज उरली नसून, ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्याची सुविधा सुरू झाली आहे. या सुविधेचा लाभ घेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण १ हजार १९८ ग्राहकांनी घरबसल्या आपल्या नावात बदल करून घेतला आहे.
महावितरणच्या या ऑनलाइन पोर्टलचा वापर करण्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्राहक आघाडीवर आहेत. जिल्ह्यातील १ हजार १४४ ग्राहकांनी नावात बदल केला आहे, तर रत्नागिरी जिल्ह्यातील ५४ ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. मालमत्तेची खरेदी-विक्री, वारसा हक्क किंवा अन्य कारणांमुळे मालकी हक्क बदलल्यानंतर वीजबिलावर नाव बदलण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत सोयीची ठरत आहे.
ऑनलाइन प्रक्रिया शुल्क भरल्यानंतर अवघ्या ३ ते ७ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होते.
वीजभारात बदल करणेही झाले सोपे
नावात बदलासोबतच महावितरणने लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, व्यावसायिक आणि घरगुती ग्राहकांसाठी १५७ किलोवॅटपर्यंत वीज भारवाढीसाठी ऑनलाइन स्वयंचलित मंजुरी देण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांना स्वतःचा मंजूर वीजभार वाढवणे किंवा कमी करणे आता एका क्लिकवर शक्य झाले आहे.
४८ तासांत वाढीव वीजभार
वाढीव वीजभाराच्या गरजेनुसार किंवा सिंगलऐवजी थ्री फेज मीटरची मागणी असल्यास, नवीन मीटर लावण्याचे आदेश यंत्रणेद्वारे स्वयंचलितपणे एजन्सीला दिले जातात. ज्या ठिकाणी नवीन मीटरची आवश्यकता असते, अशा ठिकाणी साधारणतः ४८ तासांमध्ये वीजभार वाढीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाते.